पावसाळा आणि अस्थमा (भाग-२)

डॉ. राजेंद्र माने

प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे. पावसाळा सुरु झाला की अस्थमा/दमा यात वाढ होते आणि मग रुग्णाचा त्रास वाढत रहातो.

 

 

लहान मुले अधिक सक्षम होण्यासाठी…

श्वास साठवण्याचे प्रमुख काम ज्या फुप्फुसांमार्फत होते, तेच व्यवस्थित झाले नाही, तर मेंदूला ऑक्‍सिजनचा पुरवठा कसा होणार? व कार्बन डायऑक्‍साइड तरी पुरेशा ताकदीने कसा बाहेर फेकणार? हे वास्तव समोर आल्यानंतर तरी दक्ष पालकांनी जागे होऊन पुढची पिढी आरोग्यसंपन्न व शक्तिशाली कशी होईल यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. फुप्फुसांची शक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासून मुला-मुलींना व स्वत:ही दीर्घ श्वसनाची सवय लावून घ्यावी म्हणजे फुप्फुसांद्वारे जास्तीत जास्त हवा खेचली जाऊन नाकपुडीतून उच्छवासाद्वारे दूषित हवा बाहेर पडून फुप्फुसे आरोग्यदायी राहतील. फुप्फुसांची शक्ती वाढवण्यासाठी मोकळी हवा मिळायला हवी. सर्व प्रकारचे प्रदूषण टाळायला हवे. प्रदूषणावर तर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण प्रदूषण जास्त असेल तर तोंड व नाकावर मास्क वा रुमाल बांधून प्रदूषणापासून दूर राहता येईल.

पालकांनी निदान सुट्टीच्या दिवशी तरी मुलांना मोकळ्या हवेत खेळायला व धावायला न्यावे. मुलांबरोबर थोडा मोकळा वेळ काढून त्यांच्याबरोबर खेळल्यास त्यांचाही उत्साह वाढेल. त्यामुळे भरपूर प्राणवायूचा पुरवठा व कार्बनचा निचरा होईल.

पण मुलांना खेळण्यास, धावण्यास आज मोकळी मैदाने नाहीत. हे वास्तव आहे. मोकळ्या मैदानावर मुले धावू, खेळू शकतात, सायकल चालवू शकतात. मैदानांचा मुलांना होणारा हा फायदा लक्षात घेऊन तरी मैदानांची संख्या वाढवायला हवी. ही मैदाने केवळ मुलांसाठीच आरक्षित असावीत.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो पालकांनी लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे मुलांना रोज वरण, भात, भाजी, पोळी, हिरव्या पालेभाज्या, फळे अशा सकस आहारांचीच सक्ती करावी. मुलांना असलेले जंक फूडचे व्यसन असेल तर त्यापासून दूर राहणे का आवश्‍यक आहे हे मुलांना चांगल्या रीतीने समजवून सांगावे. कारण जंकफूड म्हणजे पोषण नसलेला चरबीयुक्त आहार, जो शरीराचे पोषण तर करत नाहीच, पण अनेक आजार मात्र निर्माण करतो. त्या पदार्थामधील अतिरिक्त मीठ, ग्लुटामेट, चरबी हे पदार्थ आरोग्यदायी नसून ते फक्त लठ्ठपणास कारणीभूत ठरतात. जंक फुडमुळे दम्याची भीती वाढते. सध्या मुलांचे फुप्फुस निकोप नसताना त्यांना पोळी, भाजी, वरण, भात, फळे असा पौष्टिक आहार दिला गेला नाही, तर मुलांची निरोगी वाढ होणार तरी कशी?

अस्थम्याचे बदललेले स्वरुप

दमा अर्थात अस्थमा. श्वसननलिकेला सूज आल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे फुफ्फुसाला होणाऱ्या ऑक्‍सिजनच्या पुरवठयाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे श्वासोच्छवास करताना त्रास होतो किंवा सतत धाप लागल्यास दमा आहे, असं समजावं. दमा हा आजार अनुवांशिकतेने अथवा वाढत्या प्रदूषणामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये दम्याच्या आजाराची लक्षणे असल्याचे दिसून येऊ शकते.

 • दमा आजार कसा ओळखावा
 • वातावरणात जरा बदल झाल्यास
 • शिंका व खोकला येणे
 • दम लागणे
 • छाती भरल्यासारखे वाटणे.
 • घरघर करणे
 • दमट हवामान, ढगाळ वातावरण यामुळे दमा असलेल्या रुग्णांना त्वरित त्रास होऊ शकतो

विशेष काळजी घेण्याची आवश्‍यकता

आनुवंशिकता – ज्या कुटुंबात आई अथवा वडिलांना दमा आहे अशा पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेऊन पूर्वकाळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यांच्या मुलांना दम्याचा त्रास उद्भवण्याची दाट शक्‍यता आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना दम्याचा धोका अधिक असल्याचे विविध सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. वाढते शहरीकरण, गाडयांची रहदारी तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण यामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

बदललेली आहारपद्धती हे ही दमा होण्यास प्रमुख कारण मानलं जात आहे. पाश्‍चमात्य आहारपद्धतीचं आपल्यावर झालेलं अतिक्रमण त्यामुळे पिज्झा, बर्गर, फास्ट फुड, चिप्स, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या पद्धतीची शीतपेय आदीचे अधिक सेवनही दमा होण्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. फळांचे कमी सेवन हे सुद्धा दमा होण्याचे एक कारण मानले जात आहे.

सिझेरीयन पद्धतीद्वारे ज्या बाळांचा जन्म झाला आहे अशा बालकांमध्ये दमा होण्याची शक्‍यता अधिक असल्याने विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांनी वर्षातून आपली तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. दमा नियंत्रणात येऊ शकतो किंबहुना पूर्णत: बराही होऊ शकतो. तुम्हाला जर दमा असल्याचं निष्पन्न झालं तर घाबरून जाऊ नका. दमा म्हणजे आयुष्यभराचा सोबती अशीच काहीशी समज सर्व स्थरावर आहे. योग्य पथ्य व काळजी घेतल्यास दमा पूर्णत: नियंत्रणात आणता येऊ शकतो. इन्हेलर पंप थेरपीद्वारे दम्यावर उपचार करता येतात. विशेष बाब म्हणजे आता काही प्रकारच्या बिकट दम्यावर ब्रोन्कीयल थर्मोप्लास्टी या अत्याधुनिक उपचारपद्धतीद्वारे इलाज होऊ शकतो. पूर्वी ही उपचारपद्धती फक्त परदेशातच उपलब्ध होती. आता मात्र आपल्याकडेही ही नवीन उपचारपद्धती काही ठिकाणी कार्यरत झाली असल्याने अशा प्रकारच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अस्थमा असलेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्‍यक

 • घरातील हवा खेळती रहावी. हवा स्वच्छ ठेवणारे प्युरीफायर अथवा एसी वापरावा. तसेच, ओलसर भिंतीमुळेही दमा वाढवू शकतात.
 • कुठेही बाहेर प्रवास करत असाल किंवा प्रदुषणसदृश विभागात गेल्यास नाकाला मास्क लावणे आवश्‍यक
 • घरातील पडदे नेहमीच झटकून ठेवा. बेडशीट्‌स, रोजच्या वापराचे कपडे दिवसाआड गरम पाण्याने धुवा. एकंदर, तुमचे राहते घर नेहमी स्वच्छ व प्रसन्न असले पाहिजे.
 • गडद सुंगंध असलेले परफ्युम वापरू नका. काही पदार्थ खाल्याने ऍलर्जी होऊ शकते अशा पदार्थाची यादी बनवून असे पदार्थ शक्‍यतो टाळा.
 • काही पदार्थ खाल्याने ऍलर्जी होऊ शकते. उदा. चायनीज फुड ज्यामध्ये अजिनोमोटो व विनेगरचा वापर होतो, मशरूम, कोळंबी.
 • घरातील पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे दमा वाढण्याची शक्‍यता असते. नियमित व्यायाम व योग्य आहार घ्या.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)