राज्यभरात पावसाचा जोर वाढणार

घाटमाथा चिंब, तुरळक ठिकाणी मुसळधार

पुणे – नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसामध्ये गेल्या दोन दिवसांपासून प्रगती नाही. तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. परिणामी, सोमवारपासून (दि. 1 जुलै) पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. श्रीवर्धन आणि भिवंडी येथे सर्वाधिक 210 मिमी पावसाची नोंद झाली. गुहागर, राजापूर, गगनबावडा येथे प्रत्येकी 190, बेलापूर येथे 180, पनवेलमध्ये 170, वेंगुर्ला येथे 160, माथेरान, रोहा, मंडणगड येथे प्रत्येकी 150, कुडाळ, माणगाव, राधानगरी येथे 140 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढला असून, कोयना परिसरात 170, अम्बोणे येथे 140 तर ताम्हिणी घाटात 110 मिमी पावसाची नोंद झाली, असे हवामान विभागाने सांगितले.

रविवारी (दि. 30) कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर अन्य भागात पावसाने विश्रांती घेतली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोकण-गोव्यातील अलिबाग येथे 24 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईमध्ये 16, डहाणूमध्ये 13, सांताक्रुझ येथे 9 तर रत्नागिरी येथे 6 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर येथे 68 मिमी पाऊस झाला. तर अन्य शहरात पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. यामुळे बळीराज काही अंशी सुखावला असून पेरणीची लगबग सुरू आहे.

शहरात सायंकाळपर्यंत रिपरिप
शहरात मागील आठ दिवसांपासून रोज सुरू असलेल्या पावसाने रविवारी सायंकाळनंतर उघडीप दिली आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 4 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला असून, दोन दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. शहरात 1 ते 30 जूनदरम्यान 197 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)