नगर शहरासह तालुक्‍यात पावसाची हजेरी

बळीराजा सुखावला; रखडलेल्या पेरण्यांना येणार वेग

पहिल्याच पावसात खोदलेले चर, माती नाले पाण्याने तुडुंब
बळीराजा सुखावला; रखडलेल्या पेरण्यांना येणार वेग

पावसामुळे मनपाचा कारभार चव्हाट्यावर

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डपकी साचली होती. त्यामुळे दुचाकीस्वारांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अनेक ठिकाणच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने महापालिकेच्या कारभार चव्हाट्यावर आला असून, लोकप्रतिनिधींचे ही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. यावर प्रशासनाने वेळेत उपाय योजना करावी अशी ही मागणी नागरिकामधून होत आहे.

नगर/चिचोंडी पाटील – मृग नक्षत्रही कोरडे गेल्याने आणि पाऊस लांबल्याने चिंतातूर झालेल्या बळीराजाला गुरुवारी (दि.27) रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. नगर शहरासह तालुक्‍यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने, पेरण्यांना आता वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासूनच बी-बियाणांच्या दुकानात गर्दी केलेली दिसून येत होती.

नगर तालुक्‍यात गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागला होता. यावर्षीही मान्सून पूर्व पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र, बुधवारी (दि.26) व गुरुवारी सायंकाळी नगर तालुक्‍यातील अनेक गावात आर्द्रा नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

शहरासह तालुक्‍यातील सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, खडकी, खंडाळा, वाळकी, चिचोंडी पाटील, खातगाव टाकळी, वाळूंज आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर मांजरसुंबा, डोंगरगण, शेंडी, पिंपळगाव माळवी, वडगाव या परिसरात तुरळक पाऊस झाला.
पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू केली असून, उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्यामुळे बळीराजा आनंदी झाला आहे. गुरुवार रोजी सकाळपासूनच वातावरणात दमटपणा असल्याने पावसाच्या आगमनाचे अंदाज बांधण्यात आले होते. सायंकाळी विजेच्या कडकडाटांसह पावसाचे जोरदार आगमन झाले.

अनेक गावामध्ये पाणी फाऊंडेशन स्पर्धेअंर्तगत 8 एप्रिल ते 27 मे या कालावधीत नगर तालुक्‍यातील सोनेवाडी, सारोळा कासार, डोंगरगण, शेंडी, जेऊर (बा) या गावांनी पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत सहभाग घेत जलसंधारणाचे काम केले होते. पहिल्याच पावसात खोदलेले चर, माती नालाबांध पाण्याने तुडुंब भरल्याने गावांतील ग्रामस्थांनी जल्लोष केला. उन्हातान्हात राबून केलेल्या श्रमदानाचे फळ मिळाल्याचा आनंद या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.