पुणे – शहरात पावसाची “नॉनस्टॉप इनिंग’ सुरू असून, दररोज पडत असलेल्या संततधार पावसामुळे मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. बुधवारी (दि. 10) दिवसभरात 15 मिमी पावसाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस अशीच “इनिंग’ सुरू राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मागील दहा दिवसांपासून शहरात अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे झाडपडीसारख्या घटना घडत आहे. रविवारच्या (दि. 7) “ब्रेक’नंतर सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही (दि. 10) सकाळी 11 वाजेनंतर जोरदार हजेरी लावली. थांबून-थांबून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कोथरूड, पाषाण आणि कात्रज परिसरात जोरदार पावसाच्या सरी झाल्या. दरम्यान, दि.1 जूनपासून आत्तापर्यंत 330 मिमी पावसाची नोंद झाली असून, पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाची संततधार राहील. दि.14 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होणार असून, कमाल तापमानात वाढ होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.