गाव-खेड्यांकडे पावसाची पाठ; शहरांत भरमसाठ

कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात धुव्वाधार


 मराठवाड्याला अजनूही कोरड : पेरण्या खोळंबल्या

पुणे – राज्यात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. धरणसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली. मात्र, नेहमीप्रमाणे यावर्षीही मान्सूनने मराठवाड्याकडे पाठ फिरवल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर बनला असून पेरण्याही खोळंबल्या आहेत. दरम्यान, पुढील 24 तासांत कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात कोकणातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तलासरी येथे सर्वाधिक 220 मिमी पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्‍वर येथे 200, ओझरखेडा येथे 170, महाबळेश्‍वरमध्ये 140, हरसुल येथे 130, पौड, मुळशी परिसरात 120 तर गगनबावडा, लोणावळा येथे प्रत्येकी 100 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर मराठवाड्याकडे मान्सून पूर्ण पाठ फिरविल्यामुळे “वरूणराजा कधी येणार’ अशी हाक नागरिकांकडून दिली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सोमवारी (दि. 8) मुंबईमध्ये धुव्वाधार पाऊस झाला असून, सांताक्रुझ परिसरात तब्बल 122 मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग परिसरात 39 मिमी पाऊस झाला. तसेच मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वरमध्ये 79 मिमी पावसाची नोंद झाली असून, पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची संततधार होती. बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्यांना सुरवात झाली असून, असाच पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात अजूनही पावसाचा जोर वाढला नसून, खऱ्या अर्थ्याने या भागात पावसाची गरज आहे.

कोयना परिसरात अतिवृष्टी
घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून, गेल्या 24 तासात कोयना परिसरात अतिवृष्टी झाली आहे. तब्बल 340 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शिरगाव परिसरात 190 आणि ताम्हीणी घाटात 130 मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावर येणारे धबधबे पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळा, खंडाळा, ताम्हीणी घाट परिसरात गर्दी करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)