येणारे दोन दिवस पावसाचे : वातावरणातील बदलाचा परिणाम

पुणे – उत्तरेकडील वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा राज्यात देखील प्रभाव जाणवू लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे तापमानातही चढ-उतार झालेला दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या उत्तरेकडे एक पश्‍चिमी कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मैदानी राज्यांमध्ये हलक्‍या स्वरुपाचा, तर उत्तर भारतीय डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीसह जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

ओडिसाच्या उत्तरी भागात मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्‍यता आहे. या पावसाचा उत्तर भारतातील प्रमुख पीक असलेल्या गव्हाचे उत्पादन वाढण्यास फायदा होणार आहे. मात्र, अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

उत्तरेकडील बदललेल्या या वातावरणाचा परिणाम राज्यावर सुद्धा होणार आहे. राज्यातील तापमानात शुक्रवारी सकाळपासून फरक पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात झालेली वाढ दोन ते तीन अंशाने घसरली आहे. विशेष करून विदर्भ, मराठवाड्यात 35 ते 36 अंशापर्यंत खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)