पावसाचा दगा; शेतीला फटका

पुणे – जुलैचा दुसरा पंधरवडा उजाडला, तरी राज्यात अद्याप निम्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. मराठावाडा आणि विदर्भात पावसाने मोठी ओढ दिल्याने पेरणी क्षेत्र घटले आहे. राज्यात खरीप पिकांच्या फक्‍त 54 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र हे 149.74 लाख हेक्‍टर आहे, त्यापैकी 80.61 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे एकूण लागवड क्षेत्राशी हे प्रमाण 54 टक्के भरते. राज्यात पुणे व लातूर विभागात काही ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता आहे. ऊस क्षेत्र वगळून जर राज्यातील खरीप पिकांच्या पेरणीची आकडेवारी पाहता एकूण क्षेत्र हे 140.69 लाख हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी 80.33 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप राज्यात निम्मे क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत.

राज्यातील विभागावर पेरण्याचा अहवाल पाहिला असता सर्वाधिक पेरण्या या औरंगाबाद विभागात झाल्या आहेत. या विभागात आतापर्यंत 20.15 लाख हेक्‍टर पैकी तब्बल 14.45 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. सरासरी तब्बल 72 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पहिल्या टप्यात औरंगाबाद विभागात अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ही पेरण्याची कामे सुरू केल्याने आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल नाशिक विभागात 64 टक्के, तर कोल्हापूर विभागात 50 टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे सुरू झाली आहेत.

पुणे पिछाडीवर
पुणे विभागात आतापर्यत फक्त 40 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागातील काही तालुक्‍यांमध्ये अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

पाऊस अपुरा
राज्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 324.6 मि.मी पाऊस पडला आहे. राज्यातील 355 तालुक्‍यापैकी 28 तालुक्‍यांमध्ये 25 ते 50 टक्के, तर 137 तालुक्‍यांमध्ये 50 ते 75 टक्के, 98 तालुक्‍यांत 75 ते 100 टक्के आणि 92 तालुक्‍यांत 100 टक्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)