पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी ‘सरीवर सर’

संग्रहित छायाचित्र

पुणे – शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. मध्यवस्तीसह कोथरुड, वारजे, कात्रज, धनकवडी या परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गेले दोन दिवसांपासून शहरातील तापमानात फरक पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसाने थोडा दिलासा दिला आहे. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी पावसाची हजेरी असे वातावरण सध्या आहे.

शहरात साधारणत: साडेचार ते पाचवाजेनंतर वातावरण बदलण्यास सुरूवात झाली. आकाशात ढग जमू लागले आणि सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर थोड्याच वेळात पावसाचे आगमन झाले. उपनगरातील कोथरुड, वारजे, कर्वेनगर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.गणपती माथा ते उत्तमनगर चौका पर्यत रस्त्यावर तळी साचली. या पाण्यातून जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.

याशिवाय धनकवडी, कात्रज परिसरातही पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. यामुळे कोथरुड-शिवण भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पावसाने रस्ते निसरडे झाल्याने वाहने घसरुन पडण्याचे प्रकार सुद्धा काही भागात घडले. शहराच्या मध्यवस्तीमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या असल्या, तरी ढगांचा कडकडाट मात्र सुरू होता.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारीसुद्धा शहरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)