ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषाचा “पाऊस’

हलक्‍या सरी आणि ठिकठिकाणी रांगोळ्या काढून हडपसरमध्ये पालख्यांचे स्वागत

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग

विठूनामाचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या उक्‍तीप्रमाणे त्यांची पावले भर पावसातही झपाझप आपल्या मुक्‍कामाच्या ठिकाणी पडत होती. दुपारी सव्वादोनच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने लोणी काळभोर मुक्‍कामी प्रस्थान केले. वारीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भक्‍तांची संख्या मोठी असल्याचे पाहावयास मिळाले. वारकरीबांधवांनी दाटलेला गाडीतळ परिसर याची प्रचिती देत होता. संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी साडेनऊच्या सुमारास सासवड रस्त्याने तर संत तुकाराम महाराजांचा सोहळा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गाने मार्गस्थ झाला.

हडपसर  – ध्यास एक, आस एक, अट्टहास एक, मैलोन्‌ मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्‍या विठुरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली-तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी हडपसरमध्ये दाखल झाल्या. भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि नामघोषाने वातावरण भक्‍तिमय झाले होते. हडपसर, मांजरी, मुंढवा व आसपासच्या परिसरातून आलेले नागरिक मोठ्या भक्‍तिभावाने त्यांचे स्वागत करत होते.

शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व “जय हरी विठ्ठल’ असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेवून निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्‍तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्‍या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण भक्‍तीमय झाले होते.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी गाडीतळ येथील विसाव्यावर दाखल झाली. सुमारे तासभर विसाव्यावर माऊलींच्या पालखीचे दर्शन नागरिकांनी घेतले. तर सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी गाडीतळ येथे विसाव्यावर दाखल झाली. पालखी विसाव्यावर दाखल होताच वरुणराजाने हजेरी लावत जलाभिषेक घातला. जय जय रामकृष्णहरीचा निरंतर नामजप, जोडीला टाळमृदंग, त्याच्या तालावर डोलणारी पावले हे दृश्‍य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्यने गर्दी केली होती.

यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, आमदार योगेश टिळक, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक नाना भानगिरे, मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका पूजा कोद्रे, उज्ज्वला जंगले, स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, माजी नगरसेवक विजय देशमुख, सुनील बनकर, तानाजी लोणकर आदी उपस्थित होते. संत तुकारामांचा चांदीचा रथ लक्ष वेधून घेत होता. मन प्रसन्न करणारी फुलांची आकर्षक सजावट, त्यावर केलेली फुग्याची आरास, हे सारे आपला कॅमेरा व मोबाइलमध्ये टीपण्यासाठी गर्दी दाटली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)