पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला अवकाळी पावसाने रविवारी चांगलेच झोडपून काढले. शहराच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार हजेरीने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
दोन दिवसांपूर्वीच शहरात पावसाने थोड्या फार प्रमाणात हजेरी लावली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे बाजारात विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
सोसाट्याचा वारा व पडत असलेल्या पावसाने एकच दाणादाण उडविली. दोन दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता. मात्र, एक दिवस दडी मारल्याने वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला होता. शहर परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह सुमारे एक तास झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले.
काही दिवस शहर परिसरात उन्हाचा तडाखा व रात्री उकडा जाणवत होता. आज (रविवारी) सकाळपासूनच शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.
विद्यार्थी, पालकांची तारांबळ
अनेक शाळा उद्यापासून (दि.10) पासून सुरू होत आहेत. त्यामुळे पालकांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गाठली होती. मात्र, सायंकाळी आलेल्या पावसामुळे अनेकांना ही खरेदी करण्यात अडचण आली. पावसापासून बचाव करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती.