उत्स्फूर्त प्रतिसाद : विनारक्षित तात्काळ तिकिटाच्या जनजागृतीसाठी पुणे स्टेशनवर मदत कक्ष
-विष्णू सानप
पिंपरी – मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तातडीचे तिकीट काढण्यासाठी व प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या युटीएस ऍपला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्थानकावर एकाच वेळी तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो तर कधी-कधी प्रवाशांना ना विलाजास्तव विनातिकीटही प्रवास करावा लागतो. प्रवाशांना येणाऱ्या या अडचणींची दखल घेत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व स्थानकांसाठी युटीएस ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपच्या माध्यमातून विविध तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ऍपच्या जनजागृतीसाठी पुणे स्टेशन येथे मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
प्रवाशांना सुरक्षित आणि त्वरीत आनरक्षित तिकीट काढाता, यावे यासाठी बनवण्यात आलेल्या युटीएस ऍपची सुविधा 4 एप्रिल 2018 पासिून उपनगरीय स्थानकांसाठी सुरु करण्यात आली होती. तर, 12 ऑक्टोबर 2018 पासून पुणे विभागातील सर्वच स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. या ऍपचा गतवर्षी एप्रिल ते मे महिन्यांत 4 हजार 99 प्रवाशांनी वापर करत तिकीट काढले. यातून रेल्वेच्या तिजोरीत 56 हजार 578 रुपयाची वृद्धी झाली. तर यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात 44 हजार 266 प्रवाशांनी या ऍपचा वापर केल्याने रेल्वेला 5 लाख 77 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या 13 महिन्यांत रेल्वे प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून याबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी, याकरीता रेल्वेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
“रेल्वेच्या वेळेत सर्वच प्रवाशी तिकीट खिडकीवर गर्दी करतात, त्यामुळे प्रवाशांचा वेळ जातो शिवाय त्रासही सहन करावा लागतो. प्रवाशांना तिकीट काढायचे असते मात्र, रेल्वे निघण्याची वेळ झाल्यामुळे तिकीटन न मिळालेले प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. या बाबी टाळण्यासाठी ऍपची सुविधा उपयुक्त आहे.
– संजय कुमार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
युटीएस ऍप असे करा डाऊनलोड
विनाआरक्षित तिकीट आपल्या मोबाईलवरच काढण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर किंवा ऍप्पल स्टोअरवर जावून युटीएस ऍप डाऊनलोड करावे. नतंर आपल्या नावाने रजिस्टर केल्यानंतर तिकीट काढण्यासाठी ऍपचा वापर करता येतो. यासुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होते.