पुणे – पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची दि. 31 मेपर्यंतची आरक्षणे फुल्ल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रशासनाने नियोजित व्यतिरिक्त जादा गाड्या सोडल्या आहेत. मात्र, प्रवाशांची गर्दी पाहता गाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुट्टीनिमित्त मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आरक्षणासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी पाहायला मिळत आहे.
पुणे स्थानकाहून सुटणाऱ्या मेच्या शेवटच्या आठवड्यातील आणि जून महिन्यातील स्थानकात येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण “फुल्ल’ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वेकडून देशातील विविध मार्गांवर साप्ताहिक, द्वि साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे-एर्नाकुलम, अहमदाबाद-मद्रास, पुणे-काझिपेठ, पुणे-अंजनी, पुणे-उदयपूर, पुणे-सावंतवाडी, धारवाड-हबीबगंज, पुणे-गोरखपूर आदी पंधरा ते वीस मार्गांवर “समर स्पेशल’ गाड्या धावणार आहेत. पुणे-नागपूर गरिब रथ, पुणे-जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेस, पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस आदी गाड्यांचे 31 मेपर्यंतचे तर पुणे-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, पुणे-हजरत निजामुद्दिन एक्स्प्रेस, पुणे-हावडा दुरांतो या गाड्यांचे 10 जूनपर्यंतचे आरक्षण “फुल्ल’ झाले आहे.