तिकीट तपासणी अधिकाऱ्यासोबतही घातली
हुज्जत दौंड येथे विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
दौंड – विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उरूळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. 10) तिकीट तपासणी अधिकारी राजेंद्र काटकर यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या नवनाथ पोळ (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर) यास रेल्वे सुरक्षा दलाच्या साह्याने पकडले होते; परंतु त्याने रेल्वे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाशी हुज्जत घातली. मात्र, त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 9 एमएम बनावटीचे विदेशी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक मोबाइल संच असा एकूण 40 हजार रुपयांचा ऐवज आढळून आला असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अमलदार दत्तात्रेय खोत यांनी दिली.
याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार सेवक मणिराम सयाम यांनी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार त्याच्याविरूद्ध आर्म ऍक्ट आणि भारतीय रेल्वे कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ पोळ याच्याकडे हे पिस्तूल कोठून आले आणि पिस्तूल बाळगण्यामागील त्याचा उद्देश स्पष्ट झालेला नसून, पोलीस त्या कारणांचा शोध घेत आहेत, अशी माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली. पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अप्पर अधीक्षक तुषार पाटील, उपअधीक्षक नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ताराचंद सुडगे पुढील तपास करीत आहेत.