कराडात दारूधंद्यांवर छापे

 14 हजारांची दारू जप्त, 16 जण ताब्यात

कराड – कराड उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध दारू धंद्यांवर छापे मारून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत 14 हजार रूपये किंमतीची 49 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी कराड शहर, कराड तालुका आणि उंब्रज येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी कारवाई सातत्याने केली जाणार असल्याचे उपअधीक्षक ढवळे यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सातारा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध पोलिस ठाण्यांना भेटी देऊन अवैध धंद्यांविरोधात कारवाईच्या सूचना केल्या होत्या. उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी कारवाईची मोहीम सुरू केली. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिवार पेठ व कार्वे नाका तसेच गोळेश्वर, येरवळे, मलकापूर, गोवारे, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणवाडी, शेरे स्टेशन, येळगाव व येणके आणि उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरे, हेळगाव, वाघजाईवाडी, मुरुड, अशा 16 ठिकाणी अवैध दारूधंद्यांवर छापा टाकून सोळा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 हजार 28 रुपये किमतीची सुमारे 49 लिटर दारू जप्त करण्यात आली. संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या दोघांवर कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)