राहुरी तालुक्‍यात वाळूउपसा राजरोस सुरू

file photo

तहसीलदार निवडणुकीत, तर पोलीस निरीक्षक प्रभारी

राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नव्यानेच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे हे तात्पूरते प्रभारी म्हणून काम पाहत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ वाळूवाल्यांनी चांगल्याच प्रकारे घेतला असून मुळा नदी पात्राचे लचके तोडले जात असल्याचे चित्र आहे.

राहुरी विद्यापीठ – तालुक्‍यात अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. मातीमिश्रित वाळू लिलावाच्या गोंडस नावाखाली राजरोसपणे नदी पात्रातून उपसा करण्याची किमया साधली जात असून पोलिस व महसूल प्रशासनाकडून छुपा पाठींबा मिळत असल्याची परिसरात चर्चा होत आहे.

आरडगाव भागातील मुळा नदीपात्रातून तर प्रवरा नदीपात्रातील बहूतेक सर्वच परिसरातून विशेषतः गंगापूर, संक्रापूर, चिंचोली आदी भागातून राजरोसपण मातीमिश्रित वाळू लिलावाच्या नावाखाली मुळा, प्रवरा नदी पात्रातून जेसीबी व पोकलॅनच्या सहायाने रात्रंदिवस वाळू उपसा होत असून याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

राहुरी तालुक्‍यात वाळू तस्करीने सर्वसामान्यांना हतबल केले आहे. अल्पावधीतच अफाट संपत्ती कमविण्याचा मार्ग म्हणून अनेकांनी वाळू धंदा सुरू केलेला आहे. मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवायची व त्याद्वारे शासकीय प्रशासनाशी लागेबांधे निर्माण करून सर्वसामान्यांना पायदळी तुडविण्याचे कारस्थान राहुरी भागात सुरू असल्याचे चित्र आहे. राहुरीच्या वाळू तस्करीतून खून, मारहाण, गोळीबार, तलवारीने हल्ले आदी प्रकार यापूर्वी घडले असून त्यातून प्रशासन काही एक बोध घेताना दिसत नाही.

नुकतेच वाळू व्यावसायिकांनी मातीमिश्रीत वाळू लिलावाच्या नावाखाली नदी पात्रातून वाळू उपसा करण्याचा अनोखा गोरखधंदा सुरू केलेला आहे. उंबरे भागात काही दिवसांपूर्वी मातीमिश्रित वाळू लिलाव घेणाऱ्यांकडून असाच काही पराक्रम पहावयास मिळाला होता. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत असलेल्या मातिमिश्रीत वाळू लिलाव घेत नदी पात्रातून वाळू उपसा करण्यात आला.

मुदत संपल्यानंतरही उंबरे परिसरात दिवसा जमिन उकरून तर रात्री नदी पात्रातून वाळू उपसा करून लिलावाच्या पावत्यांचा सुरेखपणे उपयोग करून घेतला जात होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविताच सदरचा ठेका बंद करण्यात आला. त्यानंतर राहुरी महसूल प्रशासनाने आरडगाव भागातील 250 ब्रास मातीमिश्रित वाळू लिलाव करण्याचा परवाना नुकताच दिला आहे. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत मातिमिश्रीत वाळू वाहतुकीची परवागी देण्यात आली होती.

त्याचाच लाभ घेत काहींनी मुळा नदी पात्रात जेसीबी व पोकलॅन उतरवून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा होत आहे. आरडगाव ते राहुरी रस्त्यावर दिवस व रात्रभर वाळूने भरलेली वाहने वाहतच असून नदी पात्रातून वाळू उपसा केलेला असल्यानेच आरडगाव ते राहुरी रस्ता ओला होत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रमाणे उघडपणे मुळा नदी पात्रातून वाळू उपसा होत असतानाही पोलीस व महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासकीय प्रशासनाच्या पाठींब्यानेच सर्व खेळ चालू असल्याचे सांगितले जात आहे. नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्यानंतर शेतीसिंचनाचा प्रश्‍न बिकट होत असल्याची परिस्थिती राहुरीत आहे.

वाळू उपशामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत असून प्रशासनाचा पाठींबा असल्याने वाळू धंदे करणाऱ्यांचे चांगलेच फावले जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गांभीर्याने लक्ष देत राहुरी भागात मातीमिश्रित लिलावाच्या नावाखाली नदी पात्रावर धाड टाकण्याचा सुरू असलेला पराक्रम थांबविण्याची मागणी केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)