भीज पावसाचा राहुरीतील खरिपाला फायदा

राहुरी – सलग दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रातीनंतर आज तालुक्‍यात हलक्‍या ते मध्यम पावसाने सकाळपासून कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली. अर्ध्या अधिक खरीप पिकांच्या पेरण्या वाया गेल्यानंतर शेतातील शिल्लक पिकांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे. तालुक्‍यात सर्वच ठिकाणी पावसाने दिवसभर कमीअधिक प्रमाणात संततधार कायम ठेवली. जोर कमी असला तरी मात्र अशा पावसाने जमिनीत पाणी मुरण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने तालुक्‍यात दमदार हजेरी लावली होती. त्याच पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची मोठ्या क्षेत्रावर पेरणी केली होती. त्यात बाजरी, मका, मूग, कपाशी, कांदा, सोयाबीन पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. सुरुवातीच्या हलक्‍या पावसात पिकांची वाढ जोमदार झाली. नंतर पावसाने पुर्णपणे उघडीप दिल्याने भुसार पिके सोडून देत कपाशी पिक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली होती. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील वरशिंदे, ताहाराबाद, कणगर, कानडगाव, तांभेरे, निंभेरे, वाबळेवाडी आदी जिरायत क्षेत्रातील कपाशी पिकाला शेतकरी कुटूंबांनी डोक्‍यावरुन पाणी दिल्याचेही चित्र दिसले होते.

पावसाची ओढ त्यात मध्यंतरीचा सोसाट्याच्या वाऱ्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे सुकल्याबरोबरच विहिरी व कूपनलिकाही कोरड्याठाक पडल्याने खरीप हंगाम निम्माअर्धा वाया गेल्यातच जमा झाला आहे. दुबार पेरणीच्याही आशा आता मावळून गेल्या आहेत. पावसाअभावी बहुतांश पिके करपून गेली. यातून तग धरून वाचलेल्या पिकांना या पावसाने दिलासा मिळणार आहे. पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शेतकऱ्यांच्या मागणीवरून मुळा व भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याबरोबरच पिकांसाठी आवर्तन सध्या सुरू आहे.

रब्बी हंगामाला फायदा…

आज सकाळपासून पावसाने हलक्‍या ते मध्यम पावसाने थांबून थांबून हजेरी लावली आहे. पावसाचा हा जोर असाच दोनतीन दिवस टिकून राहिल्यास सुरू असलेले मुळा कालव्यांचे आवर्तन पाटबंधारे विभागाला बंद करावे लागणार आहे. बऱ्याच अवधीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून पावसाची अशीच संततधार अखंड सुरू राहिली तर आताचा खरीप तर गेला परंतु पुढच्या रब्बी हंगामासाठी पाणी पातळी वाढली तर त्याचा पिकांना फायदा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)