राहुलचे स्वप्न टोकियो ऑलिंम्पिकचे !

क्रीडांगण : अमित मधुकर डोंगरे

महाराष्ट्राचा मातीतला रांगडा गडी राहुल आवारे आता भुतकाळात काय घडले आहे हे सगळे विसरून टोकियो ऑलिंम्पिकच्या तयारीला लागला आहे. रिओ ऑलिंम्पिकला पाठवताना झालेला अन्याय, खोटी आश्‍वासने सगळे काही तो विसरला आहे आणि आता खच्चून तयारी करत आहे ती 57 किलो वजनी गटात टोकियो गाजविण्याची. आता नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात त्याने कुस्तीतील पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले आणि आशियाई स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. अर्थात त्याचे मुख्य लक्ष्य जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंम्पिकमधील सुवर्णपदकावरच असल्याचे त्याने व्यक्‍त केले आहे.

याच्या दहाव्या वर्षी वडिलांकडूनच प्रेरणा घेत राहुल आखाड्यात उतरला. त्याच्या वडिलांनीही या पोरामध्ये दम आहे हे वेळीच ओळखले आणि त्याला कोल्हापूरऐवजी बीडवरून थेट पुण्यात आणले. रूस्तम-ए-हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्या ‘गोकुळ वस्ताद’मध्ये त्याने प्रवेश घेतला आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली हा गडी तयार व्हायला लागला. अचानक मामांचे निधन झाले मग त्यांचे सहकारी व नामांकित पैलवान काका पवार यांनी राहुलला आंबेगाव कुस्ती संकुलात आपल्याच निगराणीखाली प्रवेशही मिळवून दिला. राहुलला गोविंद पवार आणि सुनिल लिम्हन यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.

2008 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पहिले वहिले सुवर्णपदक मिळवले मात्र त्यानंतरही तो लंडन ऑलिंपीक 2012 ला पात्र ठरला नाही. निराश न होता त्याने 2016 रिओमधील ऑलिंम्पिकची तयारी सुरू केली. मध्यंतरीच्या काळात 2011 मध्ये त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक जिंकत आपण रिओसाठी सज्ज होत असल्याची साक्ष दिली पण म्हणतात ना तुमचे कर्तृत्व किती असो एक टक्‍का तरी नशिबाची साथ लागतेच आणि हेच नशिब राहुलसाठी फिरले. जॉर्जियाला रिओच्या तयारीसाठी राहुल गेला पण तिथे होणाऱ्या पक्षपातीपणाला कंटाळून मायदेशी परतला तो सराव शिबिर अर्ध्यावर सोडून.

या त्याच्या कृतीवर भारतीय कुस्तीगीर महासंघाने कारवाई केली व राहुल याच्याऐवजी संदीप तोमरला रिओला पाठवले. अपेक्षेप्रमाणे तोमरने पहिल्याच फेरीत माती खाल्ली. राहुलच्या रूपाने रिओत मिळू शकणारे पदक महासंघाच्या निर्णयामुळे हुकले आणि कुस्तीत पुरूष गटात आपले मल्ल हात हलवत परत आले. महिला गटात साक्षी मलीकच्या पदकाने आपली लाज राखली.

राहुलवर जेव्हा शिस्तभंगाची कारवाई झाली तेव्हा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची भेट घेतली होती व महासंघालाही बोलून तोमर ऐवजी तुलाच रिओला पाठवू यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले होते. सगळंच फिस्कटले, मुख्यमंत्र्याच्या विनंतीलाही महासंघाने केराची टोपली दाखवली व तोमरलाच रिओला पाठवले. या सगळया अन्यायाचा वचपा काढताना राहुलने एका दगडात दोन्ही पक्षी मारले. प्रो रेसलींग स्पर्धेत राहुलने संदीप तोमरला लोळवले व वचपा काढला शिवाय महासंघालाही दाखवून दिले की आपणच कसे पात्र होतो.

यंदा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राहुलने साठ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. आता तो केवळ सव्वीस वर्षांचा आहे त्यामुळे महासंघाने आता तरी त्याच्याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी कारण तो केवळ टोकियो (2020) येथील ऑलिंपीक नव्हे तर पॅरिस (2024) ऑलिंम्पिकही खेळू शकतो. वय त्याच्या आड येणार नाही. केंद्र सरकारने सुरू केलेल्या टीओपी (टार्गेट ऑलिंम्पिक पोडीयम) योजनेतही त्याचा समावेश 57 किलो वजनी गटात आहे. जितका कमी वजनी गट असतो त्यात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात आव्हान थोडे कमी असते. सध्या तो आंबेगाव कुस्ती संकुलात सराव करण्याबरोबरच पी. व्ही. पी. महाविद्यालयात शिकत आहे तसेच भारतीय रेल्वेनेही त्याला हंगामी सेवेत सामावून घेतले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल नुकताच त्याला रोख साडेसात लाख रुपयांचा पुरस्कारही मिळाला आहे.

सुशिलकुमारच्या न्यायालयीन प्रकरणानंतर खरेतर भारतीय कुस्ती रिओ ऑलिंम्पिक पूर्वीच बदनाम झाली होती. त्यातच आवारेला न पाठवता तोमरला पाठवून महासंघाने स्वतः अपयशाचे धनी होण्याचा मान मिळवला. एका चांगल्या खेळाडूवर अन्याय झाला आता त्याला ऑलिंम्पिक पदकासाठी चार वर्षे वाट पाहण्याची वेळ महासंघाने आणली. कोणत्याही खेळाडूचे मग तो कोणत्याही खेळातील असला तरी देशाचे प्रतिनिधीत्व करत पदक जिंकण्याचेच स्वप्न असते तेच राहुल आवारेनेही पाहिले होते, पण महासंघाने त्याच्या स्वप्नांची पार राख रांगोळी केली. तरी आता राहुल डगमगलेला नाही तर उलट जास्त जोमाने मेहनत घेत आहे त्याचा प्रत्यय टोकियोत निश्‍चितच येईल.

यंदाच्या व पुढील वर्षी पुन्हा एकदा ऑलिंम्पिक पात्रता फेरी होईल. यावेळी तरी गेल्या तीनही मोसमातील व आगामी दोन वर्षातील कामगिरीचा निकष लावून महासंघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी व पात्रतेसाठी पाठवावे. गोल्डन ग्रां. प्री. स्पर्धेत ब्रॉंझ, डेव्ह शुल्टज्‌ स्पर्धेत रौप्य अशी एकापाठोपाठ पदके जिंकणारा राहुल आवारे हाच खरा ‘इंडिया मटेरियल’ आहे हे आता तरी महासंघाने मान्य करावे. नवीन क्रीडामंत्री राजवर्धन राठोड स्वतः एक खेळाडू असल्याने ते आता कोणावरही अन्याय होवू देणार नाहीत अशी अपेक्षा आहे. आजवर खाशाबा जाधवांचे नाव आपण गौरवाने घेत आलो आहोत त्यांनी खरेतर सर्वप्रथम भारतीय कुस्तीला ऑलिंम्पिक प्रतिष्ठा मिळवून दिली. राहुल आवारे सारखे अनेक मल्ल याचसाठी सराव करत आहेत, झगडत आहेत आता कोणावरही अन्याय होता कामा नये. राहुलला संधी मिळाली तरी तो त्याचे नक्कीच सोने करेल व भारताला कुस्तीत ऑलिंम्पिकमध्ये पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून देईल.

गोल्डकोस्ट ऑस्ट्रेलिया येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. हे त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील आजवरचे पहिलेच सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2008 मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत त्याने अफलातून कामगिरी केली व तेथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला. येत्या संप्टेबर महिन्यात इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत तो सहभागी होत असून तेथेही अशीच सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. राष्ट्रकुलमधील कामगिरीमुळे राज्य सरकारने त्याला रोख रकमेच्या पुरस्काराबरोबरच जिल्हा पोलीस उपअधीक्षक पदाची नियुक्‍त करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सध्या कुस्तीपटूंना केवळ सहा हजार रुपये मासिक मानधन स्वरूपात मिळते त्यात येत्याकाळात भरघोस वाढ करण्याचेही सरकारने ठरवले आहे.

बीड येथील हा खेळाडू अत्यंत मेहनतीने व जिद्दीच्या जोरावर या स्तरापर्यंत पोहचला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिंम्पिक पोडियम) या योजनेत राहुलचा समावेश झाला असल्याने त्याला आता केवळ आशियाईच नव्हे तर टोकियोतील ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी उच्च दर्जाचा सराव करता येणार आहे. पुण्यात तो रूस्तुमे हिंद हरिशचंद्र बिराजदार यांच्याकडे सराव करत होता; मात्र त्यांच्या निधनानंतर वरिष्ठ कुस्तीगिर काका पवार यांच्याकडे सध्या तो सराव करत आहे. या दोघांच्या मार्गदर्शनामुळेच राहुल आवारेला खरी ओळख मिळाली आज भारतीय कुस्ती क्षेत्रात सुशिलकुमार यांच्या नंतर देशाला पदक मिळवून देण्याची क्षमता केवळ राहुलमध्येच आहे आणि टोकियो
ऑलिंम्पिंकमधील सुवर्णपदक हेच त्याचे अंतिम धेय आहे. राज्य सरकारच्या सीआरएस निधीतूनही येत्या काळात आवारेला मदत मिळणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा ही आशियाई आणि ऑलिपिंक यांची रंगीत तालीम ठरली व त्यात आवारे यशस्वी ठरला आता हिच सात्यतपूर्ण कामगिरी त्याने आशियाई स्पर्धेत केली तर तो थेट ऑलिंम्पिंकला पात्र ठरेल. आवारेसारखे कुस्तीपटू खरे तर राष्ट्रीय संपत्तीप्रमाणे जपले गेले पाहिजेत त्यांना केवळ मानधन वाढवून उपयोग होणार नसून ऑलिम्पिंकपूर्वी अधिकाधिक स्पर्धेमध्ये खेळवले गेले पाहिजे तसेच जपानला होणाऱ्या ऑलिंम्पिंक स्पर्धेपूर्वी बरेच दिवस आधी आवारेसारख्या खेळाडूना जपानला सरावासाठी पाठविले गेले पाहिजे. तेथील वातावरणाशी जुळवून घेणे व तेथील स्थानिक खेळाडूं बरोबर सरावाची संधी मिळणे महत्वाचे आहे.

भारताला जर ऑलिपिंक मधील आपले कुस्तीचे वर्चस्व राखायचे असेल आणि पदक मिळवायचे असेल तर खेळाडूना केंद्रस्थानी ठेवून योजना आखून त्यांची वेळेवर अंमलबजावणी झाली पाहिजे. राष्ट्रकुल स्पर्धा हा केवळ एक ट्रेलर होता मात्र जपानमधील पूर्ण चित्रपट यशस्वी ठरावा असे वाटत असेल तर खेळाडूंसाठी जे काही महत्त्वाचे आहे ते सर्व क्रिडा मंत्रालयाने केलेच पाहिजे. ऑलिम्पिंकमधील पदक मोजण्यासाठी आजवर आपल्याला एका हाताची काही बोटे सुद्धा जास्त होतात. 120 कोटी लोकसंख्येच्या या देशात ही परिस्थिती बदलायची असेल तर केवळ खेळाडूच्या पातळीवरच नव्हे तर क्रीडा मंत्रालय आणि संघटनात्मक पातळीवरही बरेच बदल हाती घ्यावे लागतील तरच आवारेसारखे खेळाडू ऑलिम्पिंकमध्येही यशस्वी ठरतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)