केवळ मोदींच्या अहंकारामुळेच पुलवामाच्या जवानांना शहीदांचा दर्जा नाही : राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांना शहीदांचा दर्जा द्या अशी आम्ही मागणी केली आहे पण केवळ पंतप्रधानांच्या अहंकारामुळेच या जवानांना तो न्याय अजून मिळालेला नाही असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. पण आता निदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तरी निमलष्करी दलाच्या जवानांना चांगली वेतनश्रेणी देण्याचा निर्णय ते घेतील अशी आम्हाला आशा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

निमलष्करी दलाचे जवान जेव्हा त्यांच्या प्राणाची आहुती देतात त्यावेळी त्यांच्या देशाप्रति दिलेल्या योगदानाचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यासाठी पुलवामा हल्ल्यातील सीआरपीसीच्या जवानांना शहीदांचा दर्जा द्या अशी सुचना आपण त्यांना केली होती. पण ती सुचना आमच्याकडून आल्याने त्यांचा अहंकार आड आला असून त्यामुळेच त्यांनी जवानांना हा सन्मान नाकारला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी ट्‌विटरवर केला. पुलवामाच्या हल्ल्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्यावेळी मोदींनी या जवानांना वेतनवाढ देण्यासही विरोध केला होता असे ते म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत जवानांचे प्राण वाचवण्यासाठी नेमके काय केले असा सवाल कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही उपस्थित केला आहे. मोदींच्या हस्ते आज युद्धस्मारकाचे उद्‌घाटन होत आहे. या स्मारकाचे आम्ही स्वागतच करतो पण जवानांचे बळी वाचवण्यासाठी मोदींनी काय केले याचेही उत्तर मिळाले पाहिजे असे कपिल सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे. उरीच्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले, पुलवामाच्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असे अन्यही अनेक हल्ले झाले पण ते प्रकार रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली आहे तेही लोकांना समजले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)