७२ हजार रुपये देण्यात येणार ही राहुल गांधींची घोषणा केवळ फसवणूक – अरुण जेटली

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी नव्या योजनेचे आश्वासन दिल्यानंतर भाजपकडून टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने नेहमीच योजनांच्या नावाखाली फक्त फसवणूकच केले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसने नेहमी गरिबी हटवण्याच्या फक्त घोषणा केल्या. मात्र, सत्यात त्यासाठी काहीच केले नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यास देशातील गरीब जनतेला वर्षाला ७२ हजार रुपये देण्यात येतील अशी राहुल गांधींची घोषणा ही केवळ फसवणूक असल्याचा दावा अरुण जेटली यांनी केला आहे.

इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये गरिबी हटवण्याची घोषणा दिली. परंतु गरिबी हटविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत. वाढत्या उत्पादनक्षमतेवर इंदिरा गांधी यांचा विश्वास नव्हता, त्यांनी केवळ गरीबीचे वितरण केले असल्याचा घणाघाती आरोप अरुण जेटली यांनी केला.

तसेच मागील ५० वर्षांपासून काँग्रेसने गरिबी हटाव च्या नाऱ्याखाली देशाची फक्त दिशाभूल केली असल्याचे अरुण जेटली म्हणाले. आज देखील देशात २० टक्के गरीब असून त्यांची मिळकत जर १२००० रुपये पेक्षा कमी असेल तर याला सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचे अरुण जेटली म्हणाले.

काँग्रेसच्या या योजनेपेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना विद्यमान सरकारने राबविल्या असल्याचे अरुण जेटली म्हणाले.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेसची सत्ता आल्यास देशातील गरीब जनतेला वर्षाला 72 हजार रुपये देण्यात येतील अशी मोठी घोषणा केली होती. देशात 20 टक्के गरीब असून पाच कोटी कुटुंबातील 25 कोटी जनेतला याचा थेट फायदा होणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)