अमेठी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे येत्या बुधवारी अमेठीतून अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती पक्षाच्यावतीने आज देण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी याही उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी पक्षाच्यावतीने गौरीगंज गावात रोड शोही आयोजित करण्यात आला आहे. गेली पंधरा वर्ष राहुल गांधी या लोकसभेत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
यावेळी लागोपाठ दुसऱ्यांदा त्यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याशी सामना करावा लागणार आहे. स्मृती इराणी यांनी या आधीच तेथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यानी स्मृती इराणी यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता. तथापि गेल्या पाच वर्षात स्मृती इराणी यांनी या मतदार संघात सातत्याने संपर्क ठेवल्याने त्या यंदा अधिक जोरदार लढत देतील अशी अपेक्षा आहे.