राहुल गांधींनी घेतला पिठलं भाकरीचा आस्वाद

संगमनेर – कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरात आघाडीच्या उमेदवारासाठी झालेली प्रचार सभा आमदार बाळासाहेब थोरात यांची राजकीय उंची’ वाढवणारी ठरली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरची सभा रद्द करुन ती संगमनेरात आणण्यापासून ते खा. गांधींना मुक्कामी ठेवून त्यांचा शाही मराठमोळा पाहुणचार करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे नेटके नियोजन थोरातांनी केले. यावेळी गांधी यांनी पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला.

शिर्डी मतदारसंघाचा एकहाती तंबू सांभाळणाऱ्या आमदार थोरात यांनी स्वच्छ प्रतिमा, पक्षनिष्ठा आणि प्रामाणिक राजकारणातून गांधी घराण्याशी साधलेली जवळीक त्यांना थेट गांधी घराण्याच्या किचन कॅबिनेटमध्ये प्रवेश देऊन गेली आहे.
खा. गांधी यांच्या नियोजनातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नंदूरबार येथील सभा सुरक्षा, तसेच काही कारणाने रद्द झाल्या. त्यानंतर संगमनेर येथे शिर्डी लोकसभेचे कॉंग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गांधी यांना शुक्रवारी बालासोरहून निघण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांचे विमान नाशिकला रात्री आठच्या सुमारास उतरले.

पुढचा प्रवास संगमनेरकडे असल्याने तसेच रात्री हेलिकॉप्टरनेही जाता येत नसल्याने त्यांना पुढच्या प्रवासासाठी रस्तेमार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खा. गांधी यांचे रात्री आठच्या सुमारास ओरिसातील बालासोरहून नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर अतिविशेष सुरक्षा असलेल्या गांधी यांच्यासोबतच्या 18 गाड्यांचा ताफा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिकच्या द्वारका सर्कलवरून संगमनेरच्या दिशेने रवाना झाला. देशातील एका मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि तेही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास रस्तेमार्गाने करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

संगमनेरातील जाणता राजा मैदानावर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान सभा संपल्यानंतर सत्यजितजी देर हो गयी है. मै आज यही हॉल्ट करूंगा.’ खा. गांधी यांच्या या वाक्‍याने युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना धक्काच बसला. सोबत कपडे नव्हते. रात्री साडेअकरा वाजता संगमनेरमधील एका कापड दुकनातून शॉर्ट, टी शर्ट खरेदी केले गेला. अंगावरचे कपडे रात्रीच धुवून सकाळ साठी तयार केले. संगमनेर येथील अम्रृत वाहिनी कॉलेज येथील अमृत कुटीच्या एका लहानशा गेस्ट हाऊसमध्ये गांधींचा काल रात्री अचानक मुक्काम झाला.

थोरात, तांबे कुटुंबियासह कॉंग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधीच्या साधे व सहजपणाचा अनुभव आला. सोबत कपडेही नव्हते. रात्री मुक्कामी असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे व डॉ. हर्षल तांबे इतक्‍या मोजक्‍याच मंडळींच्या उपस्थितीत राज्याच्या राजकारणातील अनेक खलबतेही झाली. त्यामुळं सर्वच नेत्यांना त्यांच्यासोबत मनमोकळं पणानं बोलता आले. रात्री त्यांनी आवर्जून पिठलं व भाकरीचा आस्वादही घेतला. सकाळी गांधी यांनी दही व थालिपिठावर ताव मारला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ते आमदार थोरात यांच्यासह हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)