आता गुजरात कोर्टाचेही राहुल गांधींना समन्स

अहमदाबाद – महाराष्ट्र आणि बिहार पाठोपाठ आता गुजरात मधील एका कोर्टाने राहुल गांधी यांना त्यांच्या एका वक्तव्याच्या संबंधात फेर समन्स जारी केले आहेत. त्यांनी एका वक्तव्यात अमित शहा यांचा उल्लेख खून प्रकरणातील आरोपी असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात येथील स्थानिक भाजप नेत्याने स्थानिक कोर्टात बदनामीचा दावा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने राहुल गांधी यांना हे समन्स जारी करण्यात आले असून त्यांना 9 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे.

या आधी त्यांना या प्रकरणात 1 मे रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते व्यस्त असल्याने ते त्यावेळी उपस्थित राहु न शकल्याने त्यांच्या विरोधात हे समन्स नव्याने जारी करण्यात आले आहे. सकृत दर्शनी या खटल्यातील आरोपात तथ्य आहे असा निर्वाळा अहमदाबादच्या अतिरीक्त महानगर न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला होता.

राहुल गांधी यांनी 23 एप्रिल रोजी जबलपुरच्या सभेत अमित शहा यांचा उल्लेख खुनाच्या प्रकरणातील आरोपी असा केला होता. त्याला आक्षेप घेणारी ही याचिका भाजपचे स्थानिक नगरसेवक कृष्णवदन ब्रम्हभट्ट यांनी सादर केली होती. अमित शहा यांच्यावर खुनाच्या गुन्ह्याचा आरोप होता. पण ते त्यातून निर्दोष सुटले आहेत असा ब्रम्हभट्ट यांचा दावा आहे. सोहराबुद्दीन आणि तुलसीराम प्रजापती यांच्या हत्या प्रकरणात अमित शहा हे आरोपी होते. पण सन 2015 मध्ये विशेष कोर्टाने त्यांची या प्रकरणातून सुटका केली आहे.

अहमदाबाद मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि त्यांच्या अध्यक्षांनीही राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला असून त्या प्रकरणीही राहुल गांधी यांच्यावर समन्स जारी करण्यात आले आहेत. त्या प्रकरणात राहुल गांधी हे 12 जुलैला न्यायालयात हजर राहण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)