अमेठी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपली बहिण प्रियंका गांधी यांच्या समवेत अमेठीच्या परिसरात रोड शो करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांचे सारे कुटुंबिय उपस्थित होते. त्यात प्रियांका यांच्या बरोबरच त्यांचे पती रॉबर्ट वढेरा, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, प्रियांकाची मुले इत्यादी उपस्थित होते. या मतदार संघात आता त्यांची थेट लढत भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या समवेत होणार आहे.
यावेळी राहुल गांधी यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या रोड शोला आज मोठीच गर्दी झाली होती. या रोड शो मध्ये सोनिया गांधी या सहभागी झाल्या नव्हत्या पण त्या थेट कलेक्टर कचेरीत राहुल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होत्या. अमेठीत येत्या 6 मे रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांनी या आधी केरळ मधील वायनाड मधील लोकसभा मतदार संघातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.