पावसासाठी ७५० किमी प्रवास

पाऊस पडावा म्हणून बिरोबाला पायी दिंडीने साकडे घालणार

राहाता – पाऊस पडावा, म्हणून कर्नाटक राज्यातील घोडेगिरी येथील बिरोबा देवाला साकडे घालण्यासाठी शिर्डी व परिसरातील शंभर ते सव्वाशे धनगर समाजातील ज्येष्ठ मंडळी पायी दिंडीने निघाले आहेत. दरम्यान, तालुक्‍यासह राज्यात पावसाने दडी मारल्याने राहाता तालुक्‍यातील धनगर बांधवांनी धोतर, बंडी, पागोटे, खांद्यावर घोंगडी व हातात वेळूची काठी असा पारंपारीक वेष परिधान केलेल्या या मंडळींच्या दिंडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा हवालदिल झाला असून पाऊस पडण्याची वाट तो पाहत आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली. या कठीण परिस्थितीतून देवच वाचवू शकतो. आमचा आमच्या देवावर भरोसा आहे. त्याला साकडे घातले की सार काही आमदानी होईल, असे मत या दिंडीतील 70 वर्षीय चांगदेव बनकर यांनी व्यक्‍त केले. शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, तासगांव, खुडशी, चिंचोली, मायाक्का व घोडेगिरी असा 750 किलोमीटरचा प्रवास पंधरा दिवसाचा आहे.

देवावर हवाला ठेवून ते निघाले आहेत. या दिंडीचे जागोजागी स्वागत केले जाते. चहा-पाणी व जेवनाची व्यवस्था केली जाते. कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तेथे पोहचल्यावर देवाजवळ ढफांचा खेळ व गजनृत्य करुन देवाला साकडे घालून पाऊस पडू दे, म्हणून प्रार्थना केली जाईल. तेथे मुक्काम करुन नंतर माघारी येणार, असे असल्याचे चांगदेव बनकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)