अंबानींची निवड आम्हीच केली; राफेल व्यवहारात काहीही गैर नाही

दसॉल्ट एव्हीएशन कंपनीच्या प्रमुखांनी केला दावा

नवी दिल्ली – राफेल विमानांचा भारताशी जो खरेदी करार झाला आहे त्यात काहीही गैर झालेले नाही. आम्ही स्वत:च आमचा भारतातील पार्टनर निवडला आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीला आम्ही भागीदार म्हणून घेतले. या विमानाच्या किंमतीही तुलनेत 9 टक्‍क्‍यांनी स्वस्त आहेत असा दावा दसॉल्ट एव्हीएशन कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी केला आहे.

-Ads-

भारतातील एनएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत हा दावा करण्यात आला आहे. तथापी त्यांची ही मुलाखत म्हणजे पढवलेली मुलाखत आहे, यात सहआरोपीने मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून सत्य झाकले जाणार नाही असा पलटवार कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.

एरिक ट्रॅपिअर यांनी म्हटले आहे की, राफेलच्या भारतातील ऑफसेट प्रकल्पात आम्ही अंबानी यांच्या खेरीज एकूण 30 भागीदार घेतले आहेत. आणि अनिल अंबानी यांची निवड आम्ही स्वत:च केली. आपण ही सत्य माहिती देत आहोत, त्यात काहीही खोटे नाही. एका कंपनीचा प्रमुख म्हणून मला खोटे बोलायची सवय नाही.

विमानांच्या खरेदी प्रकरणाचा तपशील देताना ट्रॅपिअर यांनी म्हटले आहे की युपीए सरकाच्या काळात आम्ही भारताला 18 विमाने तयार स्थितीत देणार होतो आणि बाकीची 108 विमाने भारतात तयार केली जाणार होती. पण या 18 तयार विमानांऐवजी भारतातील सध्याच्या सरकारने 36 तयार विमाने घेण्यासाठी आमच्याशी करार केला. या विमानांची किंमत निश्‍चीत करताना त्यात रिनिगोशिएशन करण्यात आले.

तथापी या रिनिगोशिएशनमध्ये आम्ही भारताला ही विमाने आधीच्या किंमतीच्या नऊ टक्के स्वस्तच दिली आहेत असे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या खुलाशामुळे राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाकडून जे आरोप सातत्याने केले जात आहेत ते फेटाळले गेले आहेत. तथापी या विमानांची नेमकी खरेदी किंमत किती हे मात्र त्यांनी जाहीर केलेले नाही.

या एकूण व्यवहाराच्या रकमेपैकी निम्मी म्हणजे 30 हजार कोटी रूपये इतकी रक्कम आम्हाला भारतातील उत्पादन प्रक्रियेतच गुंतवावी लागणार आहे. या प्रकल्पांसाठी आम्ही अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट पार्टनर म्हणून घ्यायचे ठरवले आहे. त्यात आम्हीही भागीदार असणार असून हा प्रकल्प जॉईन्ट व्हेंचरच्या स्वरूपात केला जाणार आहे असेही ट्रॅपिअर यांनी स्पष्ट केले.

भारतातील सरकारी मालकीच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि कंपनीला आमचा ऑफसेट पार्टनर म्हणून काम करण्याची इच्छा नव्हती. आणि भारत सरकारला 36 विमाने तयार स्थितीत तातडीने हवी होती म्हणून आम्ही ती आमच्याच कंपनीत बनवून देण्याचा निर्णय घेतला. अनिल अंबानी यांच्या समवेत भारतात जो जॉईन्ट व्हेंचर प्रकल्प उभारला जाणार आहे, त्यात फक्त विमानांचे पार्ट बनवण्याचे काम होणार आहे असेही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

त्यांच्या या मुलाखतीमुळे कॉंग्रेसच्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे असे सांगितले जात असले तरी कॉंग्रेसने मात्र ही मुलाखत म्हणजे सहआरोपीने मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असून ही पढवलेली मुलाखत असल्याचे म्हटले आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)