मुंबई – राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे उघड होण्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईतील “आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाला दिलेल्या उत्तरामध्ये संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. राफेल व्यवहाराशी संबंधित चोरीला गेलेल्या कागदपत्रांबाबत आणि त्या संदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती या “आरटीआय’अर्जामध्ये मागवण्यात आली होती.
चोरीला गेलेल्या फाईलींबाबत पंतप्रधान कार्यालयाला आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांना माहिती आहे का? जर माहिती असेल, तर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे का, असेही गलगली यांनी आपल्या अर्जामध्ये विचारले होते. त्यावर या फायलींबाबत अंतर्गत चौकशीचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत, असे “एअर ऍक्विझिशन’ विभाग आणि “सीपीआयपो एअर ऍक्विझिशन’ च्या कॅपिटल वींगचे उपसचिव सुशिल कुमार यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळेच सरकारने याबाबतचा पूर्ण तपशील दिला नसाअवा. मात्र सरकारला या व्यवहारांमधील पूर्ण तपशील जनतेसमोर आणावाच लागेल, असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. राफेल व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेलेली नाहीत. मात्र या व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेसाठी या कागदपत्रांच्या फोटोकॉपी वापरण्यात येत असल्याचे ऍटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी मार्च महिन्यात सांगितले होते.