राफेलवरून लोकसभेत घमासान

राहुल गांधी आणि अरूण जेटली यांची रंगली जुगलबंदी

नवी दिल्ली: राफेल प्रकरणावरून आज लोकसभेत चांगलीच वादळी चर्चा रंगली. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यात जोरदार जुगलबंदी झालेली पहायला मिळाली. राफेल प्रकरणावरून राहुल गांधी यांनी सरकारवर घणाघाती टीका करताना मोदी या विषयावरून पळ काढीत आहेत, लोकसभेतील चर्चेला सामोरे जाण्याचे धैर्यही त्यांच्यात नाही असा आरोप केला तर राहुल गांधी हे सातत्याने या विषयावर खोटे दावे करीत आहेत असे प्रत्युत्तर अरूण जेटली यांनी त्यांना दिले. राहुल गांधी यांचा प्रतिवाद करताना जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलॅंड, नॅशनल हेरॉल्ड आणि बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख करीत त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींच्या एए या अद्याक्षरांच्या उल्लेखाला जेटलींचे क्‍यु ने उत्तर
या चर्चेच्यावेळी राहुल गांधी यांनी अनिल अंबानी यांना राफेलचे कंत्राट कशाच्या आधारावर दिले असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी जो माणूस सभागृहाचा सदस्य नाही त्यांचे नाव घेऊ नका अशी सुचना सभापतींकडून राहुल गांधी यांना करण्यात आली. त्यावेळी मी सभागृहात अनिल अंबानी यांचे नावही कसे घेऊ शकत नाही अशी हुज्जत राहुल गांधी यांनी घातली. त्यानंतरही त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यास सुमित्रा महाजन यांनी अनुमती नाकारल्यानंतर राहुल गांधी यांनी मग मी अनिल अंबानी यांच्या ऐवजी एए असा उल्लेख करू शकतो काय अशी विचारणा केली आणि नंतरच्या भाषणात त्यांनी अनिल अंबानी यांचा उल्लेख एएने केला. जेटली यांनीही त्यांच्या भाषणात राहुल गांधीं यांच्या प्रमाणेच आपणही एका व्यक्तीच्या नावाच्या अद्याक्षराचा वापर करू इच्छितो असे नमूद करीत त्यांनी क्‍यु या शब्दाचा वापर केला. क्‍यू म्हणजे क्वात्रोची असे त्यांना अभिप्रेत होते. त्यांच्यावर बोफोर्स प्रकरणातील दलालीचा आरोप होता. राहुल गांधी लहानपणी या क्‍युच्या मांडीवर खेळले असतील असा उल्लेख करून जेटली यांनी त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंबानींना कंत्राट का दिले?
चर्चेला सुरूवात करताना राहुल गांधी यांनी राफेवरून सरकारला काही महत्वाचे प्रश्‍न विचारले. ते म्हणाले की मुळात हवाईदलाला 126 विमानांची गरज असताना ती संख्या 36 वर कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आली? हवाईदलाने आपल्याला 126 विमानांची गरज नाही असे सरकारला सांगितले होते काय? या विमानांच्या किंमती 526 कोटी रूपयावरून सोळाशे कोटी रूपये इतक्‍या कशा झाल्या? युपीए सरकारच्या काळातील करार कोणाच्या सांगण्यावरून बदलला? प्रति विमान सोळाशे कोटी रूपये इतकी रक्कम देण्यास हवाईदलाने विरोध केला होता त्याची दखल सरकारने का घेतली नाही? स्वत: कर्जबाजारी असलेल्या अनिल अंबानी यांना सरकारने राफेलचे कंत्राट का दिले? हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स ही कंपनी विमाने बनवण्यात पुर्ण सक्षम असताना त्यांच्याकडील हे कंत्राट का काढून घेण्यात आले असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

राहुल गांधी म्हणाले की काल पंतप्रधानांनी एका वाहिनीला आधी ठरवून पुर्वनियोजितपणे 90 मिनीटांची मुलाखत दिली पण त्यातही त्यांनी राफेलवर उत्तरे दिली नाहीत. कॉंग्रेसचा आपल्यावर व्यक्तीगत आरोप नाही हा मोदींचा दावा खोटा आहे असे नमूद करून ते म्हणाले की आज सारा देश या प्रकरणी मोदींकडेच बोट दाखवत आहे. राफेल विमानांच्या किंमती गोपनीय आहेत असे निर्मला सीतारामण म्हणाल्या होत्या. मग स्वत: फ्रांसच्या अध्यक्षांनी आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा करताना विमानांच्या किंमती जाहीर करण्यात आमची काहीच आडकाठी नाही असे नमूद केले होते त्याचा दाखलाही राहुल गांधी यांनी दिला.

यांना पैशाचीच भाषा समजते
राहुल गांधी यांच्या आरोपांना अरूण जेटली यांनीही तितकीच जोरकस उत्तरे देत त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की काही जणांना केवळ पैशाचीच भाषा समजते त्यांना लढाऊ विमाने आणि देशाचे संरक्षण असे विषय महत्वाचे वाटत नाही. काहीं जणांचा खोटेपणा हाच पाया आहे असे ते म्हणाले. चर्चेत अनेक वेळा वादाचे प्रसंग आले एकावेळी तर जेटली यांनी राहुल गांधी यांना उद्देशून हा माणूस वारंवार केवळ खोटे बोलत आहे अशी टिपण्णी केली.

चर्चेच्यावेळी पर्रिकर यांच्या विषयी गोव्याचे एक मंत्री विश्‍वजीत राणे यांची ऑडिओ क्‍लीप सभागृहात वाजवण्याची परवानगी राहुल गांधी यांनी सभापतींकडे मागितली. त्यावेळी त्या क्‍लीपच्या खरेपणाचा दाखला तुम्ही देऊ शकता काय असा प्रश्‍न सभापतींनी राहुल गांधी यांना विचारला. तोच मुद्दा लाऊन धरत जेटली यांनी राहुल गांधी या ऑडिओ क्‍लीपच्या खरेपणाविषयी काही माहिती देऊ शकत नाहीत यावरूनच त्यांचा खोटेपणा वारंवार उघडा पडत आहे अशी टीका केली.

एखाद्या लहान मुलाला जो विषय समजू शकतो तोही राहुल गांधी यांना समजू शकत नाही असे जेटली यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांच्या भाषणाच्यावेळी त्यांच्या समर्थक सदस्यांनी वारंवार गदारोळ केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. या चर्चेच्यावेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)