नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेचे व्हाईस चीफ एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया यांनी गुरुवारी राफेल विमानातून भरारी घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राफेल विमान भारतासाठी युद्धपातळीवर मोलाचे ठरणार असून सुखोईसोबत तणावाच्या परिस्थितीत हल्ला करण्यास ते पुरेसे आहे. दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात सहा युद्ध अभ्यास होणार आहेत. त्यासाठी त्यासाठी भदौरिया उपस्थित राहिले आहेत.
याचबरोबर, राकेश कुमार सिंह भदौरिया म्हणाले, “राफेल विमानातून उड्डाण केल्यानंतर चांगला अनुभव मिळाला. याठिकाणी खूप काही शिकायला मिळाले असून वायुसेनेच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्यानंतर त्याचा वापर योग्यरित्या करण्यात येईल. याशिवाय, आमच्या वायुसेनेच्या ताफ्यात सुखोई-30 सोबत राफेलचाही उपयोग होईल. या दोन विमानांनी एकत्र ऑपरेशन सुरु केल्यास शत्रूराष्ट्राला चांगलाच धक्का बसेल.’
राफेल विमानात ज्याप्रकारे तंत्रज्ञान आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. ते पाहता वायुसेनेसाठी एकप्रकारे गेमचेंजर ठरु शकणारे आहे. आम्ही ज्या पद्धतीने ऑपरेशन आणि आगामी युद्धासाठी योजना आखत आहोत, यासाठी नक्कीच राफेल उपयुक्त आहे, असेही ते यावेळी म्हणाले.