रडारड अन्‌ किलबिलाटही

सातारा – जवळपास दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर सोमवारपासून (17 जून) सातारा शहरातील शाळा सुरू झाल्या. कुठे नवीन वह्या तर कुठे झाडांची रोपे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन पुस्तके, नवीन दप्तर, नवीन मित्र अशा भारावलेल्या वातावरणात शाळांच्या घंटा घणघणल्या. सातारा पालिकेच्या सतरा शाळांना सजवण्यात येऊन, विद्यार्थ्यांना भेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळा क्रं. 17 व 18 येथे नवागत छोट्यांचे जंगी स्वागत झाले. शहरातील अंगणवाड्या व बालवाडी, इंग्रजी माध्यमांच्या प्ले ग्रुप व नर्सरीमध्ये छोट्यांचा किलबिलाट व रडारड ऐकू येत होती.

खाऊच्या डब्ब्यासाठी आईची धावपळ

दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळांना सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी शाळेचा पहिला दिवस पालकांसाठी धावपळीचा ठरला. विशेष म्हणजे मुलांचा खाऊचा डब्बा करण्यासाठी आईची धावपळ होताना दिसून आली. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मुलांचा हट्ट पुरविताना देखील पालकांची चांगलीच दमछाक झाली.

सरस्वती पूजन

उन्हाळाच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवारी शाळेचा पहिला दिवस भरला. सुरुवातीला शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. शाळेत पाय ठेवल्याठेवल्या अनेक चिमुकल्यांचे डोळे पाणावले तर काहींना अश्रू अनावर झाले आणि डोळ्यातून गंगा-यमुना वाहू लागल्या. या विद्यार्थ्यांना आवरताना पालकांची तसेच शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर कसेबसे शांत केलेल्या चिमुकल्यांना घेऊन शिक्षकांनी सरस्वती पूजनाने शाळेचा श्रीगणेशा सुरू केला.

विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले तसे शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा उघडल्या. त्यामुळे चार दिवस आधीच साताऱ्यात स्टेशनरी दुकानांवर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूलबॅग, वॉटरबॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत होते. उन्हाळी सुट्टी संपली असून पुन्हा एकदा बालगोपाळांचा किलबिलाट शाळांच्या परिसरामध्ये सोमवारपासून सुरू झाला. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्याने शालेय साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. बाजारपेठेमध्ये साहित्य खरेदीसाठी बच्चे मंडळीसह पालकांची गर्दी झाली होती. शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 ते 9 या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करावा.

सकाळी 7 ते 7.30 या वेळेत गावात प्रभात फेरी काढावी. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फुल देऊन त्यांचे स्वागत करावे. सकाळी 10 वाजता परिपाठ घेण्यात यावा. त्यानंतर अध्यापनास सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या होत्या. गणवेश खरेदी करण्यासाठी कापडबाजारामध्ये गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून आलेल्या पालकांची संख्याही लक्षणीय होती. कापड घेऊन गणवेश शिवून घेण्यापेक्षा रेडीमेड गणवेश खरेदी करण्यासाठी पालकांची पसंती दिली. गणवेशासोबतच नवे बूट, नवे मोजे खरेदी केले जात आहे.

कुठे हसू अन्‌ कुठे रडू

शैक्षणिक वर्षाचा आणि शाळेचाही पहिला दिवस असणाऱ्या आपल्या चिमुकल्यांना घेऊन सोमवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर चांगलीच गर्दी झाली. यातील काही मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते तर काही मुलांचे रडणेच थांबत नव्हते. मुलांच्या या रडण्यामुळे त्यांना आवरता आवरता पालकांबरोबरच शिक्षकांचीही चांगलीच दमछाक झालेले पाहावयास मिळत होते.

पटसंख्या वाढीवर विशेष भर

सातारा पालिका शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून शाळांचा पट कमी होत असल्याने पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाळांचा दर्जा तसेच गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी पुन्हा शाळेत यावेत तसेच नवीन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. “चिमण्यांनो परत फिरा’ हे अभियान पुन्हा राबवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.

सरकारी शाळांमध्ये 25 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या एकूण 2 हजार 771 शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी 25 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्याचबरोबर खासगी व अनुदानित शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पहिलीसाठी प्रवेश घेतल्याचे दिसून आले. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात होणार आहे.

रिक्षा अन्‌ बसचा प्रवास पुन्हा सुरू

दोन महिन्यांपासून विश्रांतीवर असलेल्या स्कूल बस आणि रिक्षा पुन्हा एकदा साताऱ्यात धावताना दिसून आल्या. सकाळी बस आणि रिक्षा घरासमोर वेळेत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बच्चे कंपनीचा स्कूलबसमधील गोंधळ पुन्हा एकदा सातारकरांच्या कानावर पडत होता. त्याचबरोबर स्कूलबसमधील मित्र दोन महिन्यांनंतर भेटल्यामुळे मुलांची गाणी, गप्पा गोष्टी देखील होताना दिसून आल्या.

विद्यार्थी रमले पुस्तकात

सुमारे दोन महिन्यांच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा वाजली शाळेची घंटा. सोमवारी शाळेचा पहिला दिवस भरला. सकाळी लवकर उठून, सर्व आवराआवर करून, हवे ते साहित्य घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेत शाळा गाठली. घरातून बाहेर पडताना थोडीशी वाढलेली धाकधूक शाळेत गेल्यावर कमी झाली आणि वर्ग भरातच विद्यार्थीही पुन्हा पुस्तकात रमून गेले.

नवा वर्ग… नवा अभ्यास…
उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर कसाबसा आळस झटकून विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. जुने वर्ष संपले तसे जुना अभ्यासही संपला. आता नवीन वर्षात नवीन अभ्यास, नवीन वर्ग अशी विद्यार्थ्यांची सुरुवात झाली.
प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत जायचं म्हणजे विद्यार्थ्यांच्याही जीवावरच आलेलं असतं. मात्र, शाळेत तर जावेच लागणार हे निश्‍चित असतं. सोमवारी शाळेची पहिला घंटा वाजणार असल्याने दोन दिवसांपासून कपाटात ठेवलेले दफ्तर तसेच इतर शालेय साहित्य बाहेर काढून नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच अधिक जबाबदारीने पार पाडावी लागली.
सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने काही मुलांनी आज पहिला दिवस आहे नाही गेलं तरी चालते, आज काय शिकवत नाहीत, असाच सूर आळवला. मात्र पालकांनी समजूत काढून अगदी मुलांना सोबत घेऊनच शाळा गाठली.

पहिली घंटा वाजली अन्‌ शाळा भरली. सुरुवातीला प्रार्थना आणि नंतर विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी केले. त्यानंतर वर्ग भरले. मात्र, जुना वर्ग सोडून नव्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्याचे भाव स्पष्ट दिसत होते. तरीही नवा वर्ग आणि नव्या अभ्यासात विद्यार्थी पहिल्याच दिवशी रमून गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here