हॉंगकॉंगमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये राडा

हॉंगकॉंग – चीनला प्रत्यार्पणास परवानगी देणाऱ्या सरकारी विधेयकाला विरोध करण्यासाठी बुधवारी हॉंगकॉंग शहराच्या संसदेकडे निघालेल्या निदर्शकांना अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच हिंसक संघर्षाला सुरुवात झाली. यावेळी कित्येक हजारो निदर्शकांनी महत्त्वाचे रस्ते अडवून ठेवले. त्यामुळे पोलिस आणि निदर्शकांदरम्यान झालेल्या झटापटींमुळे पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या, बंदुकीच्या रबरी गोळ्यांचा आणि लाठ्यांचा वापर केला. निदर्शक हे काळ्या कपड्यांत होते व त्यातील बहुतेक जण तरुण आणि विद्यार्थी आहेत. चीनचा पाठिंबा असलेले हे विधेयक रद्द करावे, असे आवाहन निदर्शकांनी अधिकाऱ्यांना केले.

वादग्रस्त ठरलेले विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी निदर्शकांनी सरकारला दिलेली दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत संपताच चकमकींना सुरुवात झाली व त्या संपूर्ण दुपारभर सुरूच होत्या. गेल्या अनेक वर्षांत हॉंगकॉंग शहरात एवढी मोठी राजकीय निदर्शने आणि झटापटी झाल्या नव्हत्या. शहराच्या संसदेत या विधेयकावर चर्चा होणार म्हणून शहराच्या मध्यभागी पोलीस हेल्मेटस्‌, गॉगल्स, मास्क व छत्र्या घेऊन सज्ज होते. संसदेबाहेरच्या सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर निदर्शक असल्यामुळे ही चर्चा “नंतरच्या तारखेला’ ठेवण्यात आली आहे.

हॉंगकॉंगमध्ये प्रत्यार्पणासंबंधीचा नवीन कायदा करण्यात येत असून, त्याला प्रखर विरोध करण्यासाठी एवढे लोक रस्त्यावर उतरले आहेत. या नवीन कायद्यातील तरतुदीनुसार, बलात्कार, खून अशा गुन्ह्यांतील संशयित आरोपींना चीनची मुख्य भूमी, तैवान, मकाऊ येथे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी मिळणार आहे.

नविन कायदा करण्याची गरज का भासली?
फेब्रुवारी 2018 मध्ये हॉंगकॉंगमधील एका तरुणाने तैवान येथे जाऊन तेथील आपल्या प्रेयसीचा खून केला होता. खुनानंतर हा तरुण पुन्हा हॉंगकॉंगमध्ये परतला होता. मात्र, तैवानसोबत आरोपींच्या प्रत्यार्पणाचा करार नसल्याने त्याचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यातून नवीन प्रत्यार्पण कायद्याची कल्पना पुढे आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)