पाथर्डीत चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

शहर परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

पाथर्डी -शहर व तालुक्‍यात चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून काल रात्री शहरातील कसबा विभागात राहणाऱ्या जिजाबाई बिडवे व कारेगाव रोडवरील दूध शितकरण केंद्राच्या समोरील मीना बांगर यांच्या घरातून दोन तोळे सोने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे सत्र वाढतच असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील कसबा विभागात व कारेगाव रोडवरील दूध शीतकरण केंद्रासमोरील परिसरात शनिवारी पहाटे 2 वाजल्याच्या सुमारास चार ते पाच बनियन व अंडरपॅट असा वेश परिधान केलेल्या चोरट्यांनी कुलूप तोडण्याची टॉमी व कुकरीसारखे तीक्ष्ण हत्यारबंद असलेल्या चोरट्यांच्या टोळीने जीजाबाई बिडवे यांच्या कसबा येथील घरातून एक तोळ्याचे सोन्याचे अलंकार व पाच हजार रोकड आणि मीना संजय बांगर यांच्या घरातून त्या झोपलेल्या असताना अंगावरून एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल संच चोरून नेले. कसबा विभागात हे चोरटे एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून यामध्ये काही चोरट्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. पोलीस या चोरट्यांचा कसा तपास लावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सीसीटीव्हीचे फुटेज आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच मागील पाच दिवसांपूर्वी शिक्षक कॉलनीतील मनोज गर्जे यांच्या मालकीचे टायरच्या दुकातील 25 हजार रोकड व 1 लाख 88 हजार 850 रुपयाचे जेके कंपनीचे विक्रीकरिता ठेवलेले टायर असा एकूण 2 लाख 13 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल दुकानाचे शटर तोडून चोरून नेले आहेत.

दुलेचांदगाव येथील दीपक गर्जे यांच्या शेतातील राहत्या घरातून 31 मे रोजी 26 हजारांच्या शेळ्या चोरी गेल्या. फिर्याद दाखल असूनही त्याबाबत अजून तपास लागलेला नाही. मुंगूसवाडे येथे इंदुबाई बबन हिंगे घराचा कडीकोयंडा तोडून मंगळवारी रात्री ते सोमवार 3 जूनच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख व 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. शहरातील जुन्या बस स्थानकात देखील खुलेआम पाकीटमारी होत आहे. पोलिसांची गस्त नसल्याने गेल्या आठवड्यात नागरिकांनीच पोलिसांची वाट न पाहता तिघा पाकीटमारांना बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. याबाबत सचिन भगीरथ सोनटक्के यांच्या फियार्दीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध पाकीटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच शहरातील एका गोळी बिस्किटच्या दुकानात व एका किराणा दुकानाचे शटर उचकटून गाय छाप पोते व किराणा साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. पोलिसांची किटकीट नको म्हणून व तक्रार दाखल करूनही काही तपास लागत नसल्याने नागरिक तक्रार दाखल करायला देखील टाळाटाळ करतात. पोलिसांचा रात्रीच्या गस्तीचा अभाव यामुळे शहरातील कसबा, आनंदनगर, नाथनगर तसेच तालुक्‍यातील ग्रामीण भागात चोरटयाचे चांगलेच फावत असल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली असून रात्र जागून काढावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)