सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान 

पुसेगावात विठूनामाचा गजर; भाविकांची अलोट गर्दी
पुसेगाव –
श्री सेवागारी महाराजांची श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव-पंढरपूर पायी पालखी दिडी सोहळ्याचे पंढरपूरकडे गुरूवार दि. 4 रोजी सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनी वारकऱ्यांना येथील शासकीय विद्यानिकेतन जवळ निरोप दिला.

पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराज ट्रस्टतर्फ यावर्षीही पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज यांनी पालखी, श्री सेवागिरी महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेचे व श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे, पालखी दिंडी रथाचे विधीवत पूजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्‍वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव, प्रताप जाधव, तसेच ट्रस्टचे माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, उपसरपंच प्रकाश जाधव, संजय जाधव, गुलाबराव वाघ, दिलीप बाचल, बाळासाहेब जाधव,संदीप जाधव, प्रकाश जाधव, अंकुश जाधव, संतोष जाधव, प्रवीण जाधव, दिलीप जाधव, चंद्रकांत जाधव, बापू जाधव, रघुनाथ दळवी, राजेंद्र देवकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री सेवागिरी मंदिरापासून मिरवणूकीला सुरुवात झाल्यानंतर पायी दिंडी सोहळ्यातील फुलांच्या माळांनी सजविलेला दिंडी रथ पुसेगाव बाजारपेठेतून मिरवणूकीने एसटी बसस्थानकावरील शिवाजी चौकात आला.

यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी मनोभावे पालखी रथाचे व प्रतिमेचे मनोभावे देवदर्शन घेतले. शिवाजी चौकात वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम महाराज, श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, अभंगच्या तालावर वारकरी भक्तारसाच्या वातावरणात न्हाऊन गेले होते. देहभान विसरुन सर्व वारकरी श्री सेवागिरी, विठूनामाचा गजर करीत नाचत होते. यावेळी वारकरी महिला व पुरुषांनी फुगड्या खेळल्या. श्री सेवागिरी महाराज की जय च्या जयघोषात, अभंग, ढोल-ताशा, लेझीम, बॅंडपथक, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठ्या भक्तमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी पालखीस सुरुवात झाली. सगळा परिसर, विठोबा माऊली, ज्ञानेश्‍वर माऊली, सेवागिरी महाराज की जय या जयघोषाने दुमदुमला होता. येथील छत्रपती शिवाजी चौकात वारकऱ्यांच्या फुगड्या, गोल रिगण, पारंपारिक खेळ सादर केले.

या भक्तमय वातावरणावर उपस्थितांनी ठेका धरला. कपाळी वैष्णवांचा टिळा, बुका, डोक्‍यावर तुळशी, डोईवर पागोटे, हातात टाळ, मृदंग, विणा आणि मुखावरचा भक्तभाव असा पुसेगावसह परिसरातील पवारवाडी, वर्धनगड, फडतरवाडी, नेर, रणसिंगवाडी, विसापूर, काटकरवाडी, कटगुण, खातगुण, बुध, आदी भागातील हजारो वारकऱ्यांचा मेळा पुसेगावात झाला. श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे पुसेगाव सुवर्णनगरी अक्षरक्ष: भक्तीत न्हाऊन निघाली. श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे सारथी देवस्थानचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज होते. श्री सेवागिरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी गावातील विविध मंडळांच्या युवकांनी मसाला दूध, खिचडी व नाश्‍ताची सोय केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)