पुरूषोत्तम जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

साताऱ्यातून उमेदवारीच्या घोषणेची औपचारिकता बाकी : तुल्यबळ लढत होणार

सातारा – खंडाळा कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम जाधव यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाधव यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी ना.दिवाकर रावते, ना. अर्जुन खोतकर, ना.नितीन बानुगडे-पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे सातारा लोकसभेसाठी उमेदवारी पक्की मानली जात असून आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

पुरूषोत्तम जाधव यांनी सन 2009 मध्ये सेनेकडून सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्या निवडणूकीत त्यांना 2 लाख 35 हजार इतकी मते मिळाली होती. तद्‌नंतर जाधव यांच्या सातारा जिल्हा शिवसेना प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, 2014 च्या निवडणूकीत साताऱ्याची जागा रिपाइंला सोडण्यात आली. त्यामुळे जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवत 1 लाख 55 हजार 937 इतकी लक्षणीय मते प्राप्त केली होती.

त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणूकी दरम्यान जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करत वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. तेव्हापासून ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले होते. दरम्यान, काही महिन्यांपुर्वी कुस्ती लीग स्पर्धेत त्यांनी साताऱ्याचा संघ उतरविला. तसेच संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेते पद प्राप्त केले. त्यामुळे सातारा आणि कुस्तीचा संघ राज्यभर पोहचविला.

या पार्श्‍वभूमीवर लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आग्रही होती. भाजपकडून नरेंद्र पाटील निवडणूक लढविणार अशा देखील चर्चा जिल्ह्यात रंगल्या. मात्र, साताऱ्याची जागा शिवसेनेच्याच वाट्याला राहणार,अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षश्रेष्ठीनी घेतल्यामुळे साताऱ्याची जागा सेनेच्या वाट्याला सोडण्यात आली. परिणामी पुरूषोत्तम जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पाच वर्षानंतर पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली. जाधव यांच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर युती धर्म पाळण्यासाठी भाजप देखील जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

यंदा हिंदकेसरी होणारच

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जाधव यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आज पक्षप्रवेश झाला असून लवकरच उमेदवारीची घोषणा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करणार आहेत. यंदाच्या निवडणूकीत साताऱ्यावर युतीचा भगवा फडकणार हे नक्की आहे. मात्र, यंदाची निवडणूक कुस्तीतील हिंदकेसरी प्रमाणे असून मागील दहा वर्षात केलेल्या सामाजिक कार्याच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर कुस्तीचे मैदान मारणार, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)