कोंढवा येथील सीमाभिंत कोसळल्याचे प्रकरण
पुणे (प्रतिनिधी) – कोंढवा भागातील अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर (लेबर कॅम्प) कोसळून 15 जण ठार झाल्याची दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी दोघा बांधकाम व्यावसायिक बंधूच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी दोघांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे.
विवेक सुनील आगरवाल (वय 32) आणि विपुल सुनील आगरवाल (वय 30 दोघे रा. क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या बांधकाम व्यावसायिक बंधूंची नावे आहेत. या प्रकरणी अॅल्कॉन लँडमार्कस्चे भागीदार जगदीशप्रसाद तिलकचंद आगरवाल (वय 64), सचिन जगदीशप्रसाद आगरवाल (वय 34), राजेश जगदीशप्रसाद आगरवाल (वय 27), विवेक सुनील आगरवाल (वय 21), विपुल सुनील आगरवाल (वय 21) तसेच कांचन हाउसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी, अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक, बांधकाम मजूर पुरविणारा ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक सागर काळे यांनी फिर्याद दिली आहे.