पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आज अल्काॅन सोसायटीची संरक्षक भिंत ढासळल्याने गंभीर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपड्या करून राहिलेल्या कामगारांच्या झोपड्यांवर संरक्षक भिंतीचा मलबा पडल्याने १५ मजुरांचा मलब्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये दगावलेल्या मजुरांबाबत देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी दुर्घटना स्थळ भेट देत सदर दुर्घटनेबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्त टिळक आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सदर दुर्घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे या दुर्घटनेत दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती दिली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अल्कॅान सोसायटी उभारणाऱ्या अल्कॅान लँडमार्क्स व कांचन या दोन रजिस्टर्ड संस्थांमधील भागीदार व बांधकाय व्यावसायिकांच्या नावे गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. #PuneWallCollapse pic.twitter.com/aDUSIjalvI
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 29, 2019