पुणेकरांनी टाकलेला विश्‍वास टिकवून ठेवणार

नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांची ग्वाही

पुणे – “भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. पुन्हा एकदा भाजपलाच लोकांनी खासदार म्हणून निवडून दिले आहे. हा आमच्यावर टाकलेला विश्‍वास आहे. या विश्‍वासाला यत्किंचितही तडा जाऊ दिला नाही. योग्य पद्धतीने पुण्याचे नियोजन करू त्या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करू,’ अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी येथे दिली.

पुणे लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, विजय काळे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जगदीश मुळीक आदी आमदार, माजी खासदार प्रदीप रावत, चंद्रकांत मोकाटे, मुरली मोहोळ, श्रीनाथ भिमले, अजय भोसले, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

“विकासाचा कार्यक्रम काही दिवसानंतर ठरवू. जाहीरनामा आहे. शहराध्यक्षांना त्याची अंमलबजावणी करायची आहे. सामान्य माणसाच्या जीवनाशी प्रश्‍न सोडवण्याचे वचन दिले आहे. सातत्याने पाच-पाच निवडणुकांमध्ये जेव्हा जनता एकत्र येऊन जनता विश्‍वास टाकते तेव्हा त्याचे गांभार्य ओळखायला पाहिजे असे वाटते,’ अशी भावना बापट यांनी यावेळी व्यक्त केली.

11 हजार 500 मते कमी मिळाली
पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांना 6 लाख 32 हजार 835 आणि मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मते मिळाली. या आकडेवारीवरून गिरीश बापट हे तब्बल 3 लाख 24 हजार 628 मतांनी विजयी झाले. माझी ही अकरावी निवडणूक आहे. ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी किती मते मिळतील, याचा कार्यकर्त्यांच्या माहितीच्या आधारे अंदाज बांधतो. यावर्षी 24 तारखेला मी अंदाज बांधला होता. 6 लाख 44 हजार 500 मते मिळतील असे मी एका कागदावर सही करून तारीख लिहून ठेवले होते. प्रत्यक्ष सहा लाख 32 हजार 835 मते पडली. अंदाजापेक्षा दहा-अकरा हजार मते कमी मिळाली. दोनचार टक्के कमीजास्त होतेच. परंतु बहुतांश अंदाज जवळपास खरा ठरला, असे बापट म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)