पुणे विद्यापीठ करणार 20 हजार विद्यार्थ्यांना “कडुनिंब’ रोपांचे वितरण
पुणे – गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एकाचवेळी 20 हजार विद्यार्थ्यांना “कडुनिंब’ या प्रजातीच्या 20 हजार रोपांचे वितरण करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यादृष्टीने विद्यापीठाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या रोपांची वारी मार्गावर लागवड व संगोपन पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी करणार आहेत.
पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र यांच्या सहभागातून “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ या अभिनायांतर्गत विविध उपक्रमांचा संकल्प कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम 20 हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होत आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य क्रीडांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत दि. 22 जून रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी 20 हजार विद्यार्थ्यांना कडुनिंब या एकाच प्रजातीच्या 20 हजार रोपांचे वितरण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मनोदय विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी वाटप केलेली 20 हजारो कडुंनिबांची रोपे दि. 22 जून ते 15 जुलै या कालावधीत दोन्ही वारी मार्गावर हरितक्रांतीचा उपक्रम म्हणून लावणार आहेत. वारीमार्गावर ही रोपांची लागवड व संगोपन असा संकल्प 20 हजार विद्यार्थी करणार आहेत. या उपक्रमांतर्गत वारी मार्गावरील संपूर्ण स्वच्छता, 50 लाख पानांच्या पत्र्यावळ्यांचे वाटप, 2 लाख वारकऱ्यांची आरोग्य शिबिरातून सेवासुश्रुषा व साधनांचे वाटप, 2 लाख वारकरी व गावकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.
नावनोंदणी करण्याच्या सूचना
“स्वच्छ वारी- स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ आणि महाविद्यालयातील इतर विद्यार्थी व गटप्रमुख कार्यक्रम अधिकाऱ्यांनी दि. 6 जूनपर्यंत नावनोंदणी करण्याच्या सूचना डॉ. प्रभाकर देसाई यांनी सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.