पुणे – ‘बस बे’च्या प्रस्तावाला मान्यता कधी?

कार्यवाही करण्यात येत नसल्याने प्रस्ताव धुळखात

पुणे – राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी शहरातून जाणाऱ्या मार्गांवर “बस-बे’ करण्याच्या प्रस्तावावर अजून निर्णय झालेला नाही. “बस बे’साठी महामार्गावरील काही ठिकाणांची पाहणी करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात काम होऊ न शकल्याने प्रवाशांसह वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत असून, अपघातही होत आहे. त्यामुळे “बस बे’च्या प्रस्तावाला कधी मान्यता मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शहरातून पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-नगर आणि पुणे-सोलापूर असे महामार्ग जातात. एसटी महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्स, टॅक्‍सी या माध्यमातून या मार्गांवर प्रवासी सेवा पुरविली जाते. यासाठी महामार्गांवर उभे राहतच प्रवासी वाहनांना हात दाखवितात. तसेच, रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी वाहतूकदार महामार्गांवरच वाहने थांबवून प्रवाशांची चढ-उतार करतात. परंतु, अनेकवेळा या घटनेमुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. तसेच शहरांतर्गत भागातून जाणाऱ्या महामार्गांवर सातत्याने गर्दीचे प्रमाण जास्त असून एखादी बस, टॅक्‍सी रस्त्यामध्ये थांबल्यास वाहतूक कोंडी होते.

यामुळे महामार्गांवर प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करण्यासाठी स्वतंत्र “बस बे’ असावा अशी मागणी होऊ लागली. विविध वाहतूक संघटनांनी ही मागणी लावून धरली. वाहतूकदारांनी केलेल्या मागणीनुसार राज्य परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) प्रस्ताव तयार करत हा प्रस्ताव सुमारे पाच वर्षांपूर्वी नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) कडे दिला होता. तसेच या चारही महामार्गांची पाहणी करुन “बस बे’ करण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, “एनएचएआय’कडून अद्याप यावर कार्यवाही करण्यात न आल्याने प्रस्ताव धुळखात पडून आहे.

महामार्गांवर “बस-बे’ करावेत, याबाबत प्रत्येक रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो. प्रवासी सुरक्षिततेसाठी महामार्गांवर “बस-बे’ व्हावेत, यासाठी “एनएचएआय’ आणि शासनाकडे पाठपुरावा करत आहे.
– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)