पुणे – खासगी जलतरण तलावांबाबत धोरण काय?

संग्रहित छायाचित्र

पाणीकपात, टंचाई असूनही महापालिका प्रशासन सुस्तच

पुणे – पाणीकपात, भविष्यातील पाणीटंचाई या सगळ्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पाणीवापरावर निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या जलतरण तलावांचा समावेश आहे. परंतु खासगी तलावांचे काय असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या जलतरण तलावांबरोबरच लॉन्ड्री, गॅरेजेस या ठिकाणच्या पाणी वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. तसे आदेश महापालिका आयुक्तांनी या आधीच दिले आहेत. मात्र, खासगी जलतरण तलावांबाबत मात्र कडक निर्बंध पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये खासगी क्‍लब आणि सोसायट्यांमधील जलतरण तलावांचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील खासगी जलतरण तलावांची पाहणी करून त्यामधील पाणीवापराचा अहवाल देणे आवश्‍यक आहे. तसेच त्यांनीच त्याची वेळोवेळी पाहणी करणे आवश्‍यक आहे. मनुष्यबळाअभावी क्षेत्रीय कार्यालयांनाही हे तलाव तपासणे शक्‍य नाही. त्यातून आता निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम बंधनकारक केल्याने आता तर आयती “नाही’ म्हणण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत तरी “मनसोक्त डुंबुन घ्या’ असेच म्हणायची वेळ आली आहे.

पाणी देण्याबाबत पाटबंधारे विभागाने हात मोकळे सोडले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सगळीकडे आहे. असे असताना पाण्याचा सढळ हाताने वापर होईल, मात्र एप्रिल नंतर पुन्हा पाण्याची टंचाई भासणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा वापर करणे आता गरजेचे झाले आहे.

अधिकारी म्हणतात…
सद्यपरिस्थितीत खासगी ठिकाणी असलेल्या जलतरण तलावांमध्ये बोअरचे फिल्टर केलेले पाणी वापरणे आवश्‍यक आहे. संबंधित क्‍लब, सोसायट्या, हॉटेल्स येथे असे फिल्टरेशन प्लान्ट असणे आवश्‍यक आहे. तेथे पाहणी करण्यासाठी सध्या मनुष्यबळ पाठवणे शक्‍य नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. परंतु हा नियम बंधनकारक आहे. अचानक पाहणी केली आणि संबंधित नियम पाळत नसल्याचे दिसले, तर लगेचच कारवाई करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)