पुणे – पाण्यासाठी टॅंकरवरच भिस्त!

टॅंकर फेऱ्यांनी गाठला 2 लाखांचा टप्पा


11 महिन्यांत 2 लाख 6 हजार फेऱ्या


 खासगी टॅंकरच्या सर्वाधिक 85 टक्के फेऱ्या


पाणीपट्टीही भरा, टॅंकरचेही पैसे द्या

पुणे – एकवेळ पाणी कपात, अनियमित पाणीपुरवठा, उन्हाचा वाढता चटका तसेच पाणीचोरीमुळे शहरात पाणी टॅंकरच्या मागणीने गेल्या काही वर्षांतील उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 अखेर शहरात तब्बल 2 लाख 6 हजार 250 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यातच उन्हाळा आणखी 2 महिने बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

खडकवासला धरणसाखळीतून जवळपास 15 ते 16 टीएमसी पाणी दरवर्षी शहराला पिण्यासाठी दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढते नागरिकरण, हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली 11 गावे, मिळणाऱ्यापैकी सुमारे 40 टक्के पाण्याची गळती, त्यातच जलसंपदा विभाग आणि महापालिकेत सुरू असलेला आर्थिक वाद यामुळे शहराच्या पाण्यात वारंवार केली जाणारी कपात यामुळे या वर्षात शहरातील पाणीपुरवठा लक्षणीय विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या 11 महिन्यांत हा आकडा 2 लाखांवर पोहचला आहे.

85 टक्‍के भिस्त खासगी टॅंकर्सवर
महापालिकेकडील आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत खासगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्यालाच सर्वाधिक मागणी असून एकूण मागणीत 85 टक्के फेऱ्या या खासगी टॅंकरच्या आहेत. 2015-16 मध्ये खासगी टॅंकर-73 हजार 950, 2016-17 -86 हजार 462, 2017-18- 75 हजार 530 तर 2018-19 मध्ये 1 लाख 64 हजार खासगी टॅंकर्सच्या फेऱ्या झाल्या आहेत.

पैशांचा नव्हे, पाण्याचा बाजार
विशेषत: खासगी टॅंकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेकडून हजार ते 2 हजार रुपयांपर्यंत शुल्क निश्‍चित केले असले, तरी प्रत्यक्षात खासगी टॅंकरसाठी नागरिकांना अडीच ते पाच हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागत असल्याचे चित्र आहे. तसेच हे पाणी बांधकामे तसेच हद्दीजवळही विक्री केले जात आहे. त्यामुळे एका बाजूला नियमित पाणीपट्टी भरूनही पुणेकरांना पाण्यात कपात सहन करावी लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा टॅंकरसाठीही पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)