पुणे – पाण्याचा गैरवापर; कारवाईच नाही

नेते मंडळींची वाद टाळण्यासाठी हाताची घडी


आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनाचाच हरताळ

पुणे – शहरातील सिमेंटचे रस्ते आणि वॉशिंग सेंटरसठी वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी तपासणीसाठी रस्ते तसेच पाणीपुरवठा विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश वॉशिंग सेंटर राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबधित असल्याने कारवाई केल्यास वाद नको, म्हणून प्रशासनाने आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ फासला आहे.

शहरातील पाण्याची स्थिती गंभीर होत असल्याने अनावश्‍यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यासाठी विकासकामे तसेच सिमेंटचे रस्त्यांसाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातून घेण्याचा, तर वॉशिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आदेशही आयुक्तांनी काढले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशाला दोन आठवडे होत आले, तरी अजून रस्ते तसेच पाणीपुरवठा विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. परिणामी, रस्त्यांसाठी राजरोसपणे पिण्याचे पाणी शहरात वापरले जात असल्याचे चित्र आहे. याशिवाय वॉशिंग सेंटरही सुरू आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आदेश काढला असला, तरी प्रशासनाने अद्याप काहीच केलेले नसल्याचे चित्र आहे.

“हे पाणी नेमके कोणते?’
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, “रस्ते कामासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील पाणी वापरणे बंधनकारक आहे. शहरात महापालिकेची सुमारे 10 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र असली, तरी यातील अजून एकाही केंद्रावर पाण्याचे टॅंकर भरण्यासाठी पॉइंट उभारलेला नाही. या उलट दुसऱ्या बाजूला रस्त्यांची कामे संपविण्याची घाई सुरू असल्याचे चित्र आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात टॅंकर येत असून नियमानुसार त्यावर “हे पिण्याचे पाणी नाही’ असे स्पष्ट नमूद करणे आवश्‍यक आहे. पण, त्यावर फक्‍त “पाण्याचे टॅंकर’ असे लिहण्यात आलेले आहे. त्यामुळे “हे पाणी नेमके कोणते?’ हे स्पष्ट होत नसले तरी हे टॅंकर पालिकेच्या जलकेंद्रावरूनच भरून घेतले जात असल्याचे शहरभर चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)