पुणे – ‘व्होट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट’ अभियान

पुणे – प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला तर एक सक्षम सरकार या देशात येऊ शकते, यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील जबाबदार नागरिकांनी एकत्र येत “व्होट फॉर स्ट्रॉग गव्हर्नमेंट’ अभियान सुरू केले आहे. नागरिकांशी संवाद साधून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे. अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे, विलास रबडे, मिलिंद भागवत, अभय भंडारी, नचिकेत भंडारी, रवींद्र खाडिलकर आदी यावेळी उपस्थित होते.

शिपायाची नोकरी करण्यासाठीही दहावी-बारावी शिक्षण असावे लागते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. लोकशाहीच्या नावाखाली निरक्षर लोकांना निवडून द्यावे का हा विचार केला पाहिजे. राजकारण किंवा सगळेच राजकारणी वाईट नाहीत. त्यात अनेक चांगले आणि धडपडीने काम करणारे आहेत. तेव्हा आहे चांगल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारण्याला निवडून देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना दूर ठेवायचे असेल, तर आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे सोडल्यामुळे आणि निवडणुकीची सुट्टी फिरायला जाण्यात घालवणे यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फायदा घेऊन मूठभर राजकारण्यांनी राजकारण बदनाम केले आहे. शिवाय, देशाच्या प्रगतीत खोडा घातला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्याला समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे वाटत असले, तर आपण प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे, असे मत घारपुरे यांनी व्यक्त केले.

खेड्यापाड्यांमध्येही जनजागृती
योग्य व्यक्तीला मतदान करा आणि चांगल्या सरकारची अपेक्षा करा. आम्ही जनतेने 100% मतदान करावे म्हणून एक लाख बिल्ले तयार केले आहेत. या बिल्यांवर “व्होट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट ऍन्ड प्रोटेक्‍ट नेशन’ असे लिहिले आहे. योग्य उमेदवाराला चांगले सरकार बनविण्यासाठी मतदान करा व देश अपात्र व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारापासून वाचवा. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही फक्त चांगले सरकार निवडून येण्यासाठी मतदान करावे व या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन रबडे यांनी केले. खेड्यापाड्यांमध्ये जावूनही याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या एकूण 20 ग्रुप वेगवेगळ्या भागांत काम करत असल्याचे रबडे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)