पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) शनिवार, दि. 20 एप्रिल रोजी होणार आहे. या सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
विद्यापीठाची 30 मार्च रोजी सिनेट सभा होणार होती. मात्र उच्च शिक्षण विभागाने लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने विद्यापीठांना सिनेट सभा घेता येणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाने सिनेटची सभा पुढे ढकलली होती. मात्र यापूर्वी निवडणुकांच्या कालावधीत विद्यापीठाची सिनेटची सभा झाली होती. आताच सिनेटला मनाई का, असा प्रश्न उपस्थित होत होता.
त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विकास मंचने मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकांच्या काळात सिनेट सभा घेण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून पुणे विद्यापीठाने पुन्हा सिनेट सभा घेण्यासाठी कुलपती कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. त्याला मान्यता मिळाल्याने विद्यापीठाने येत्या शनिवारी सिनेट सभा आयोजित केली आहे. दरम्यान, ही सिनेटची सभा अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच प्रश्नोत्तर आणि ठरावावर चर्चा होणार आहे.