कमवा व शिका योजनेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार : चार अधिकाऱ्यांचा हात असल्याचे स्पष्ट
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजनेत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात विद्यापीठातील चार अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हे गंभीर प्रकरण असून या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागणार हे निश्चित आहे.
विद्यापीठात पदव्युत्तर पदवीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी प्रवेश घेतात. हे विद्यार्थी या योजनेत सहभागी होतात. प्रत्यक्षात काम न करता केवळ योजनेत नावे दाखवून या विद्यार्थ्यांना मानधनाच्या स्वरुपात आर्थिक मोबदला देण्यात आला आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे केल्या होत्या. कुलगुरूंनी तत्काळ याची दखल घेऊन माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी या गैरव्यवहाराची चौकशी करुन दोषींवर कारवाईची नुकतीच मागणी केली. याची दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ.अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीची बैठक झाली. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.मनोहर जाधव, विधी विभागाच्या प्रमुख डॉ. दुर्गाम्बिनी पटेल आदी उपस्थित होते. योजनेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन समितीने आपला चौकशी अहवाल कुलगुरूंकडे मंगळवारी (दि.25) सादर केला आहे.
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
विद्यापीठाने चौकशी अहवालाबाबत गोपनीयता बाळगली आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवालानुसार काय कारवाई होणार यावर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी तोडांवर बोट ठेवण्याला अधिक पसंती दिली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकाराने विद्यापीठाची पुरती नाचक्की झाली असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
काय म्हटले आहे समितीच्या अहवालात
“कमवा व शिका योजनेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून याबाबतचे लेखी ठोस पुरावेही समितीला मिळाले आहेत. कोणी किती व कोणत्या पद्धतीने पैसे खाल्ले? याचे कागदोपत्री स्वाक्षरी असलेले पुरावेच मिळाले आहेत. हे गैरव्यवहारांचे अतिशय गंभीर प्रकरण असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. चार पानी अहवालात समितीने कडक ताशेरे ओढले आहेत. विद्यापीठाने दोंषीवर कठोर कारवाई करावी. दोषी कोणी कितीही मोठा असला, तरी कारवाई करताना त्यांची हयगय करू नये,’ अशी शिफारस चौकशी समितीने अहवालात केली आहे.
गरीब विद्यार्थीं वंचितच
कमवा व शिका ही योजना गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे. मात्र, काही बड्या श्रीमंत घरचे विद्यार्थी विद्यापीठात कोणत्या तरी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. वर्गात कधी फारसे उपस्थितही राहत नाहीत. केवळ परीक्षा देतात. कमवा व शिका योजनेत आपली नावे नोंदवितात. प्रत्यक्षात योजनेत काही काम करीत नाहीत. खटाटोप करुन योजनेचे मानधन काढून घेतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. ग्रंथालय, वसतिगृह यांच्या सुविधा लाटतात. यामुळे प्रत्यक्षात गरजू विद्यार्थ्यांना योजनांचा काहीच लाभ मिळत नाही हे चुकीचे व अन्यायकारक आहे, अशी संतप्त भावना विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. घोटाळ्याची रक्कम संबंधिताकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.