पुणे – पुन्हा जागा वाढवून मिळण्यासाठी दबाव

विद्यापीठाकडून रिक्‍त जागांचा आढावा : निर्णय अद्यापपर्यंत ठेवला राखून

पुणे – शहरातील प्रतिष्ठित वरिष्ठ महाविद्यालयाच्या बीए, बीकॉम आणि बीएस्सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या 10 टक्‍के जागा वाढवून देण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून मिळावी, अशी मागणी संस्थाचालकांद्वारे विद्यापीठाकडे होत आहे. पुन्हा दहा टक्‍के प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काही शिक्षणसंस्थांकडून दबावतंत्र वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इयत्ता बारावीच्या विक्रमी निकालानंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा कस लागत आहे. विशेषत: कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी संख्या जास्त आणि जागा कमी, या कारणाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी झगडावे लागत आहे. अशा परिस्थितीत एकूण प्रवेश क्षमतेच्या 20 टक्‍के जागा यंदाही वाढवून मिळेल, असेच संस्थाचालकांना वाटत आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एवढेच नव्हे, ज्या महाविद्यालयांना दहा टक्‍के प्रवेशाची विद्यापीठाने मुभा दिली आहे, तेही प्रवेश फुल्ल झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी आणखी मागणी होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने पुन्हा 10 टक्‍के जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव काही महाविद्यालयाने विद्यापीठाकडे सादर केला आहे. त्यावरून पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून मिळणार की नाही, याबाबतचा निर्णय विद्यापीठाने अद्यापपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे संस्थाचालकांपुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे.

विद्यार्थी संख्या 144…शिक्षक 1…गुणवत्तेचे काय?
विद्यापीठाने महाविद्यालयांना संलग्नता देत असताना प्रवेश क्षमतेहून अधिक प्रवेश करता येणार नाही, असे नवीन विद्यापीठ कायद्यात तरतूद आहे. मात्र, शहरातील नामांकित महाविद्यालयांना दहा टक्‍के जागांची मुभा देण्यात आली. त्यानंतरही पुन्हा दहा टक्‍के जागा वाढवून देण्याची मागणी होत आहे. मुळात महाविद्यालयाच्या एका तुकडीची प्रवेश क्षमता 120 असते. त्यानंतर 20 टक्‍के जागा वाढवून दिले तर जवळपास एका वर्गात विद्यार्थी संख्या 144 इतकी राहील. त्यावरून उच्च शिक्षणाची गुणवत्ता राहील, असा प्रश्‍न शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

एजंटगिरी होत असल्याचा आरोप
विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी 20 टक्‍के जागा महाविद्यालयांना वाढवून देतात. मात्र वाढीव जागांवरील प्रवेश हे गुणवत्तेनुसार होतात, याविषयी साशंकता आहे. संस्था आपल्या स्तरावर हे प्रवेशप्रक्रिया राबवित असतात. त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांना वाढीव जागेवर प्रवेश मिळेलच असे नाही. शिवाय, शेवटच्या टप्प्यात होणारे प्रवेश आरक्षणानिहाय होत नाही. त्यात एजंटगिरी होत असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे.

प्राचार्यांची मोठी कसोटी
संस्थाचालकांच्या आदेशानुसार प्राचार्यांना वाढीव जागेवर प्रवेश करावे लागते. त्यात प्राचार्यांना स्वत:च्या अधिकारातही गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणेही अडचणीचे आहे. विद्यापीठाने अद्याप पुन्हा 10 टक्‍के जागांवर प्रवेशास मुभा दिली नाही. मात्र काही संस्थाचालकांनी विद्यापीठाकडून जागा प्रवेशास मान्यता मिळेल, असे गृहित धरून प्रवेशाची यादीही तयार केली आहे. त्यामुळे ऐनवेळी विद्यापीठाने जागा वाढवून देणार नसल्याचा निर्णय घेतल्यास संस्थाचालक तोंडघशी पडणार आहेत. या सर्व प्रकारात प्राचार्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रिक्त जागांचा विचार होणे आवश्‍यक
शहरातील मोठ्या महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी 5 हून अधिक तुकड्या आहेत. या महाविद्यालयांना 20 टक्‍के जागा भरण्यास मुभा दिली तर जवळपास एक नवीन तुकडी सुरू करता येणे शक्‍य आहे. मात्र नवीन तुकडी, तेथे शिक्षक, त्यांना वेतन अशी आर्थिक बाब पूर्ण करण्यापेक्षा संस्थाचालकांना जागा वाढवून मिळण्यास प्राधान्य असतो. दरम्यान, शहर व उपनगरच्या काही महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेशाचा जागा रिक्‍त आहेत. त्याचाही विचार होणे आवश्‍यक आहे.

काही महाविद्यालयांनी पुन्हा 10 टक्‍के जागा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, यापूर्वीच दहा टक्‍के जागा महाविद्यालयांना वाढवून दिल्या आहेत. आता पुन्हा द्यायच्या का नाही याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. शहरातील सर्व महाविद्यालयांतील रिक्‍त प्रवेशाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
– डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)