पुणे विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांची उडतेय तारांबळ

जीव मुठीत घेऊन करावा लागतो रस्ता क्रॉस : एकामागून एक सुटतात सिग्नल


वाहतूक पोलिसांकडून रस्ता क्रॉस करणाऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष


अपघात होण्याची शक्‍यता

– अर्जुन नलवडे

पुणे – औंध, पाषाण आणि बाणेर या तिन्ही मार्गावरून येणारी वाहने विद्यापीठाच्या चौकांत येतात. पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यानचा रस्ता हा मध्य शहरात जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी, रस्ता क्रॉस करताना पादचाऱ्यांची होणारी तारांबाळ आणि वाहतूक पोलिसांचे मर्यादित नियमन ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. याठिकाणी सकाळी 9 ते 11 वाजण्याच्या सुमारास वाहतुकांच्या गर्दीत नागरिकांनी रस्ता क्रॉस कसा करायचा, हा प्रश्न पादचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठ चौकात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वाहतूक नियमन करताना सकाळी 9 ते 11च्या दरम्यान विद्यापीठात जाणारा मार्ग सिग्नल यंत्रणेने बंद केलेला असतो. याच वेळेत विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थिनी नाश्‍ता करण्यासाठी व वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी आणि झेरॉक्‍स काढण्यासाठी चौकात पायी चालत येतात. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले, शालेय विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. तसेच इतरही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था व कार्यालयांत पोहचण्याची वेळी हीच असते, त्यामुळे चाकरमान्यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळही जास्त असते. अशावेळी वाहतूक पोलीस फक्त वाहनांचे नियमन करताना दिसते. मात्र, रस्ता क्रॉस करणाऱ्या पादचाऱ्यांकडे पोलिसांकडून अजिबात लक्ष दिले जात नाही. तेव्हा एका मागोमाग एक सिग्नल सुटत असल्यामुळे रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेले पादचारी जीव धोक्‍यात घालून सरळ सुटाट येणाऱ्या वाहनांच्या गर्दी घुसतात आणि रस्ता क्रॉस करतात.

औंध मार्गावरील सिग्नल सुटला की, लगेच बाणेर मार्गावरील सिग्नल सुटतो आणि तो सुटला की, लगेचच पाषाण मार्गावरील सिग्नल सुटतो. पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी थोडाही वेळ मिळत नाही. विद्यापीठातून मॉडर्न विद्यालयाच्या बाजूला जायचे असेल किंवा मॉडर्न विद्यालयातून विद्यापीठाकडे यायचे असेल तर नागरिकांना जीव धोक्‍यात घालून रस्ता क्रॉस करण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी हे तर रस्त्याच्या बाजूला झेब्रा क्रॉसिंगवर ताटकळत उभे राहताना दिसतात. विद्यापीठातील युवक गटागटाने चालू वाहनांच्या गर्दीत घुसत रस्ता क्रॉस करताना दिसतात.

अशा जीवघेण्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या पादचाऱ्यांसाठी संबंधित प्रशासन कोणती उपाय योजना करणार आहे, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासन या समस्येची दखल घेणार, असा प्रश्न विद्यापीठातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग उपस्थित करत आहे. संबंधित वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

जीव धोक्‍यात घालून करावा लागतो रस्ता क्रॉस!
मॉडर्न विद्यालय आणि कॉलेज, विद्यापीठ विद्यालय विद्यापीठ चौकाच्या परिसरात आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमीच असते. ही मुले सर्रास वाहनांच्या गर्दीत क्रॉस करताना दिसतात. त्याचबरोबर विद्यापीठातील तरुण-तरुणी आपला वेळ वाचावा म्हणून एकमेकांचा हात धरून सिग्नल सुटलेला असताना वाहनांच्या चालू गर्दीत घुसतात आणि रस्ता क्रॉस करताना निदर्शनास येतात. ज्येष्ठ नागरिक मात्र, रस्ता क्रॉस करण्यासाठी वाहनांची वाट पाहत ताटकळत उभे राहतात. शेवटी कोणाच्या तरी मदतीने चालू वाहनांच्या गर्दीतच रस्ता क्रॉस करताना दिसतात.

वाहने थांबण्याची वाट पाहावी तर, सलग तीन सिग्नल एकामागोमाग एक सुटतात. त्यातून पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणताही वेळ येथे दिलेली नाही. त्यात बराच वेळ जात असतो. आम्हाला लेक्‍चरलाही वेळेत जावे लागते. तेव्हा गाड्यांना हात दाखवून थांबवत रस्ता क्रॉस करावा लागतो. प्रशासनाने सकाळी ठराविक वेळ पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी द्यावी.
– सूरज मांजरे, विद्यार्थी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)