पुणे -चोऱ्या रोखण्यासाठी दोन लिफ्ट बंद

सोमवारी रात्री पुन्हा चोरी : पहिल्या मजल्यावरील नळ गायब

पुणे – महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीमधील चोऱ्यांचे सत्र थांबण्यास तयार नाही. सोमवारी मध्यरात्री पुन्हा पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छता गृहातील पाण्याचे नळ तसेच फ्लश पाइप चोरीस गेले आहेत. दरम्यान, या चोऱ्या रोखण्यासाठी प्रशासनाने आता या इमारतीच्या पार्किंगमध्ये जाणाऱ्या दोन लिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला असून वाहनचालकांना वरती येण्यासाठी नवीन लोखंडी जिना तयार करण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरात या इमारतीत वारंवार चोरीच्या घटना घडत असून भुरट्या चोरांकडून पाण्याचे नळ, पितळी बिजागऱ्या, दरवाजाचे हॅंडल तसेच पितळी नोझल चोरले जात आहेत. यापूर्वी तीनवेळा चोरी झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा चोरी झाली. त्यामुळे महापालिकेकडून चोर पार्किंगपर्यंत असलेल्या लिफ्ट वापरत असल्याचा जावई शोध लावण्यात आला आहे. या इमारतीत नागरिकांसाठी दक्षिण तसेच उत्तरेच्या प्रवेशद्वाराकडे प्रत्येकी 2 लिफ्ट आहेत. या दोन्ही लिफ्ट पार्किंगच्या दोन्ही तळमजल्यापर्यंत जात होत्या. मात्र, चोऱ्यांची संख्या वाढल्याने पार्किंगपर्यंत जाणाऱ्या तीन लिफ्ट आता तळमजल्यापर्यंतच धावत आहेत. त्यामुळे नागरिकांना पार्किंगपर्यंत जाण्यासाठी दक्षिणेला असलेल्या एकाच जिन्याचा वापर करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता पार्किंगपासून तळमजल्याला जाण्यासाठी आणखी एक लोखंडी जिना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे हा जिना तयार झाल्यानंतर उर्वरीत एक लिफ्टही बंद केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)