पुणे – वाहतूक शिस्तीचा ‘पुणे पॅटर्न’ विकसित करणार

पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम : अपघाती मृत्यू घटल्याचा दावा


हेल्मेट सक्ती नव्हे, तर, शिस्तीसाठी प्रयत्न

पुणे – गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारीत अपघाती मृत्युंचे प्रमाण 44 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहे. यावर्षी हे प्रमाण किमान 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा प्रयत्न असून यातून वाहतूक शिस्तीचा नवा “पुणे पॅटर्न’विकसीत करणार, असा दावा पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केला आहे.

भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर पोलीस यांच्या विद्यमाने घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा कलादालनात आयोजित वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) प्रभाकर ढमाले, भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महापालिका अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप, डेक्कन विभागाचे पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे आदी उपस्थित होते. यावेळी उत्तम चित्र काढणाऱ्या कामाक्षी कोनापुरे, प्रतीक्षा भरते, प्रतीक भुरावडे, श्रेया जोशी, ओमकार कुंजीर या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आला. हे चित्र प्रदर्शन येत्या बुधवारपर्यंत (दि.13) सर्वांसाठी खुले राहणार आहे.

वेंकटेशम म्हणाले, “जानेवारी 2018 मध्ये शहरातील विविध भागात 26 प्राणांतिक अपघात झाले होते. यात सुधारणा होत जानेवारी 2019मध्ये हा आकडा 16 पर्यंत खाली आला आहे. यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय संयुक्तरित्या काम करीत आहे. अपघातांमध्ये पादचारी मृत्युचे प्रमाण मोठे असून ते रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच, शहरामध्ये हेल्मेट सक्ती नव्हे, तर, शिस्तीसाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राऊत म्हणाले, “वाहन चालवणे ही एक कला असून ती आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे चालकांनी स्वतःला सर्वोत्तम चालक समजू नये,’ असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला.

वाहतूक सुधारासाठी सर्वकष प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक पोलीस, आरटीओ तसेच महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक सुधारासाठी एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी केअर हे चार “ई’ महत्वाचे असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)