तंत्रशिक्षण विभाग : मागील वर्षीच्या रिक्त जागांवरून घेतला धडा
पुणे – दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम प्रवेश गतवर्षी सुमारे 67 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच, शासकीय पॉलिक्टेनिकमध्ये ऑटोमोबाइल, इलक्ट्रिकल व इन्स्ट्रूमेन्टेशन डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या सुमारे 80 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी डिप्लोमा अभ्यासक्रमाचा 100 टक्के प्रवेश करण्याचा निर्धार व्यक्त तंत्रशिक्षण विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहे.
यंदा अधिकाधिक प्रवेश होण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभरात ऑनलाइन समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशन वर्ग, शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात तंत्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ तसेच उद्योगजगतातील प्रतिथयश व्यक्तींकडून डिप्लोमानंतरच्या करिअरसंधींची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळेल. यासंबंधीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय संचालक डॉ. डी. आर. नंदनवार व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रभारी उपसचिव विजय कोल्हे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
डिप्लोमाच्या जागा प्रवेशाअभावी घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय, खासगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य, विभागप्रमुखांची एक बैठक मुंबईत झाली. त्यात तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आदींनी मार्गदर्शन केले. त्यात यंदा 100 टक्के प्रवेश करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दरम्यान, या डिप्लोमा प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली असून, त्याची शेवटची मुदत दि. 18 जूनपर्यंत राहील. आतापर्यंत साडेसात हजार विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, अशी माहितीही डॉ. नंदनवार व कोल्हे यांनी दिली.
डिप्लोमा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “अभियांत्रिकी पदविका समुपदेशन’ हा ऑनलाइन समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी (दि.12) सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 12 ते 2 या वेळेत हा कार्यक्रम होईल. राज्यातील सर्व शासकीय व खासगी पॉलिटेक्निकमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होईल. यात तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व डॉ. विनोद मोहितकर हे विद्यार्थी व पालकांना पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करतील.