पुणे – ‘ते’ उमेदवार शिक्षक भरतीसाठी ठरणार अपात्र

पुणे – राज्यातील पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर “टीईटी’ परीक्षा देऊन त्यांच्या पवित्र पोर्टलवर नोंदी करणारे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.

पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील 12 हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरतीप्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 1 लाख 23 हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविता यावा यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आले आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व्हसची तांत्रिक तपासणी चालू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टल बंदच ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिद्ध केल्या जात नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. प्रत्यक्षात भरतीप्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्‍न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.

शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दिली असल्याचे उघडकीस आले आहे. डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 15 जुलै 2018 रोजी “टीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. अभियोग्यता चाचणीच्या नंतर ही “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील 865 गावातील उमेदवारांना कोणत्याही एका विषयासह कर्नाटक राज्याची “टीसीएच’ परीक्षा उत्तीर्ण असल्यास पात्र समजण्यात येणार असून याबाबत नियमांमध्ये शासनाकडून सुधारणाही करण्यात आली आहे. त्याबाबतचे शुध्दीपत्रकही शासनाने काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)